बारामती । राज्यसरकारने गरीब आणि गरजू रुग्णांसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. या योजनांमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजना ही महत्त्वाची आहे. याअंतर्गत ज्या रुग्णाचे वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आत आहे, अशा रुग्णास औषधासह शस्त्रकिया, जेवण व प्रवासाचा खर्च संपूर्णपणे मोफत आहे. मात्र बारामतीमध्ये अशा रुग्णाकडून विविध कारणांखाली 20 ते 30 हजार रुपये उकळले जातात, असे निदर्शनास आले आहे. रुग्णांना लूटण्याचे प्रकार येथे सुरू असल्याचे दिसून येते.
रुग्णांच्या अज्ञानाचा गैरफायदा
याबाबत काही स्वयंसेवी संस्थांनी हे प्रकार थांबविण्यासाठी पुढाकार घ्यावा. रुग्ण दवाखान्यात गेल्यानंतर तेथील परिस्थितीचा पाठपुरावा करून रूग्णालयाने कोणत्याही प्रकारची फी आकारू नये यासाठी देखभाल करण्याची गरज असल्याचे रुग्णांनी सांगितले. रुग्णांच्य अज्ञानाचा व गरीबीचा हा सरळसरळ घेतलेला गैरफायदाच आहे, असे एका नागरीकाने याबाबत बोलताना सांगितले. या योजनेतील रुग्णांकडे अशा प्रकारे अवैधरित्या रकमेची मागणी केल्यास त्याबाबत रुग्णाने ताबडतोब तक्रार करावयास हवी. तसेच देत असलेल्या रकमेबद्दलची लेखी स्वरुपात पावती घ्यावी. जेणेकरून या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यास मदत होईल, असेही नागरिकांनी बोलताना सांगितले. या परिस्थितीमुळे या रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
तक्रारींकडे दुर्लक्ष
बारामती तालुक्यात पाच हॉस्पिटलची या सुविधेसाठी निवड करण्यात आली आहे. मात्र या पाचही हॉस्पिटलमधून रुग्णांना चुकीचे मार्गदर्शन करून अगोदरच डिपॉझिटच्या स्वरुपात 20 ते 30 हजाराच्या स्वरुपात भरावयास लावले जातात. मात्र, या रकमेची कोणत्याही स्वरुपाची पावती वा लिखीत स्वरुपात काहीही रूग्णांना दिले जात नाही. एक प्रकारे गरीब व असहाय्य रुग्णांची ही लूटच समजली जाते. याबाबत रुग्ण तक्रारी द्यावयास तयार असतात. परंतू रुग्णांचे नातेवाईक आपल्या रुग्णास धोका पोहचू नये यासाठी घाबरत असतात. काही जण तक्रार करण्यासाठी पुढाकार घेतात. परंतु कोणत्याही स्वरुपाची कार्यवाही केली जात नाही हे विशेष म्हणावे लागेल.