महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर राज्य सरकार बनवणार चित्रपट

0

मुंबई : महात्मा जोतिराव फुले हे एक थोर समाजसेवक होते. जोतिबा फुले यांच्या जीवनकार्यावर अधारित चित्रपट तयार करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला असून या चित्रपटाच्या निर्मितीसाठी चित्रपट निर्मात्यांकडून निविदा मावण्यात येणार आहेत. या चित्रपटाच्या निर्मितीवर २० कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहे. हा पूर्ण खर्च राज्य सरकार करणार आहे. चित्रपट लेखनासाठी १ कोटी ६० लाख रूपये, परिपूर्ण संहिता प्रत देण्यासाठी ६० लाख रूपये, तंत्रज्ञ व कलाकारांचे मानधन ८० लाख रूपये, चित्रीकरण खर्च ९ कोटी रूपये, पोस्ट प्रोडक्शन कामांसाठी २ कोटी असा निधी उपलब्ध करून देणार आहे.

चित्रपटासाठी अटी

चित्रपट निर्मितीसाठी प्रशासनाने काही अटी दिल्या आहेत. यामध्ये चित्रपट विशिष्ट कालावधीत पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे. चित्रपटाची निर्मिती इतिहासातील सत्य घटनांवर आधारित असणे गरजेचे आहे. निर्मात्या टीमने या सर्व अटीपाळणे बंधनकारक असणार आहे. निर्मितीवर लक्ष ठेवण्यासाठी एक समिती नेमण्यात येणार आहे.

हा चित्रपट बनवण्याचा निर्णय आघाडी सरकारच्या काळातच घेण्यात आला होता. १५ मार्च २००३ रोजी आदेश काढून चित्रपट निर्मितीचे काम राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळास देण्यात आला होता. देवेंद्र फडणवीस सरकारनेही असा चित्रपट तयार करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, महामंडळाने चित्रपट निर्मितीला वेळ लावल्यामुळे हे काम त्यांच्याकडून काढून घेण्यात आले. त्यामुळेच आता ई-निविदा काढून चित्रपट तयार केला जाणार आहे.