पुणे । महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी मंगळवारी आझम कॅम्पस ते फुले वाडा अशी अभिवादन मिरवणूक काढली होती. 5 हजार विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते. मिरवणुकीचे उद्घाटन सोसायटीचेे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांच्या हस्ते झाले. मिरवणुकीचे नेतृत्व संस्थेचे सचिव लतिफ मगदूम यांनी केले.
संस्थेच्या कला महाविद्यालयाने सादर केलेला महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले अनाथ विद्यार्थ्यांना जेवण वाढतानाचा देखावा मिरवणुकीचे विशेष आकर्षण होता. विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांचे घोषवाक्यांचे फलक हाती धरले होते. ब्रास बॅण्डची दोन पथके, ढोलताशा, तुतारी-नगारे यात सहभागी झाले होते. आझम कॅम्पस येथून मिरवणुकीला प्रारंभ झाला. पुढे पूना कॉलेज, गोल्डन ज्युबिली, टिंबर मार्केट, सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन, बब्बनमियाँ चौक, रिझवानी मशिद, मीठगंज पोलिस चौकी, मोमीनपुरा, चाँदतारा चौक येथून मार्गक्रमण करत ही मिरवणूक महात्मा फुले वाडा येथे पोहोचली. एमसीई सोसायटीचे सचिव लतिफ मगदूम यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. डॉ. शैला बुटवाला, डॉ. रशीद शेख, डॉ. व्ही. एन. जगताप, डॉ. किरण भिसे, डॉ. भूषण पाटील, शाहीद इनामदार, वाहिद बियाबानी, शाहिद शेख, प्रा. इरफान शेख, प्रा. रबाब खान, मुमताज सय्यद, डॉ. आर. गणेसन, अजीम गुडाखूवाला, प्राध्यापक, संस्थेचे पदाधिकारी मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.