महात्मा फुले विज्ञानाच्या कसोटीवर सातत्याने प्रयत्न करणारे द्रष्टे नेते : डॉ. सबनीस

0

चिंचवड येथील जिजाऊ उद्यानात कार्यक्रम संपन्न

रावेत : थोर समाजसुधारक महात्मा फुले यांचे कार्य जगातील आदर्श गणल्या जाणार्‍या समाजसुधारकांच्या अग्रस्थानी आहे. महात्मा फुले केवळ नेते नव्हते तर विज्ञानाच्या कसोटीवर समाजबांधवांचा जीवनस्तर कसा उंचावेल या दृष्टीने सातत्याने प्रयत्न करणारे द्रष्टे नेते होते. म. फुले यांच्या कार्याचा गौरव विश्‍वरत्न पुरस्कार देऊन केला तरी तो कमी पडेल. मग त्यांना भारतरत्न का नाही, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनिस यांनी केले.महात्मा फुले ब्रिगेड, महात्मा फुले मंडळ, चिंचवड क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय सामाजिक संस्था आणि राजस्थान महाराष्ट्र माळी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने जिजाऊ गार्डन चिंचवड येथे फुले आंबेडकर गुरू-शिष्य व्याख्यानमालेच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महात्मा फुले ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग सैनी, दिल्ली प्रदेशाध्यक्षा इंद्रा सैनी, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दत्तात्रय चांबर्गे, महिला प्रदेशाध्यक्षा ललिता महावर, माजी महापौर अपर्णा डोके, ज्येष्ठ नेते वसंतराव लोंढे, नगरसेविका रेखा दर्शिले, काळूराम गायकवाड, मंडळाचे अध्यक्ष हनुमंत माळी, ब्रिगेडचे पुणे जिल्हा अध्यक्ष पन्नालाल टाक, चंद्रकांत महाजन, किशोर गोरे, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संस्थेच्या अध्यक्षा उमा क्षीरसागर, अनिता ताठे, सपना माळी, स्मिता माळी, उपाध्यक्ष अनिल साळुंके, प्रदीप पवार, नरहरी शेवते, विश्‍वास राऊत, अमर ताजणे, प्रदीप दर्शिले, वैजिनाथ माळी, नितीन ताजणे, सुर्यकांत ताम्हाणे, सोमनाथ शिरसकर, राजू माळी आदी उपस्थित होते.

म. फुले पुरस्कारापासून दूर
सबनीस पुढे म्हणाले की, देशाचे आज पर्यंतचे राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री यांना महात्मा फुलेंचा कार्याचा अभ्यास नाही केला नाही. या सर्वांनी महात्मा फुले यांना भारतरत्न पुरस्कारापासून जाणून-बुजून दूर ठेवले. त्याबद्दल सर्व सरकारचा मी जाहीर निषेध करतो. महात्मा फुले यांचे शिष्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न देऊन गौरविण्यात येते ही आनंदाची बाब आहे. परंतु बाबासाहेबांचे गुरू महात्मा फुलेंना मात्र या पुरस्कारापासून दूर ठेवले जाते याची खंत वाटते. महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचा विचार हा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलेला नसून तो संसदेच्या प्रांगणापासून ते भारताच्या कानाकोपर्‍यापर्यंत पोहोचलेला आहे. त्यामुळे महात्मा फुलेंचे कर्तृत्व एका
जातीत बंदिस्त करणे चुकीचे आहे. स्त्री शिक्षण, शेती, व्यवसाय या महात्मा फुलेंच्या व्यक्तीमत्वाच्या पैलूंसह विज्ञान आणि आधुनिकता याविषयी असलेली त्यांची आग्रही भूमिका हा पैलूदेखील त्यांच्या व्यक्तिमत्वाची ओळख करून देण्यास पुरेसा आहे.

सामाजिक न्यायापासून आजही कोसो दूर
प्रखर विरोध आणि प्रखर संघर्ष पत्करूनही त्यांनी त्यांचा विचार सोडला नाही. कारण सर्वसामान्यांच्या प्रगतीचा ध्यास त्यांनी सतत उराशी बाळगला होता. महात्मा फुले यांना सतत आधुनिकतेची आस होती. प्रत्येक क्षेत्रातील जागतिक स्तरावरचे ज्ञान प्राप्त करून देशाचा विकास साधण्यावर त्यांचा भर होता. आजही न्याय व्यवस्थेत अल्पसंख्यांक समुदायांना पुरेसे प्रतिनिधीत्व मिळालेले नाही. महात्मा फुलेंना अपेक्षित असलेल्या सामाजिक न्यायापासून आजही आपण कोसो दूर आहोत. अल्पसंख्यांकांच्या सर्वांगीण विकासासाठी संविधानात करण्यात आलेल्या तरतुदींमध्येही आज पळवाट शोधली जाते. माध्यमांमध्येदेखील अल्पसंख्यांकांना पुरेसे प्रतिनिधीत्व मिळत नसल्याने महात्मा फुलेंचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्यात अडथळे निर्माण होत आहेत, असेही डॉ. सबनीस यांनी सांगितले.

भारतरत्न देण्यासाठी केला ठराव
महात्मा फुले यांना देशाचा सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार मिळावा या साठी श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली महासभेने ठराव केला. हा ठराव तात्काळ मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती यांना पाठविण्यात येणार आहे. भारतरत्न मिळावा यासाठी पोस्ट कार्ड पाठवा या अभियानाची सुरवात देखील या वेळी करण्यात आली. यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते डॉ. श्रीपाल सबसनिस यांचा महात्मा फुले यांची पगडी, घोंगडी आणि फुले दाम्पत्याची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. तसेच उपस्थित सर्व समाज बांधवांना फुले दाम्पत्याची प्रतिमा भेट देण्यात आली. सी.ए. संघटनेचे माजी अध्यक्ष सुहास गार्डी यांनी व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी योगदान दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हनुमंत माळी यांनी केले. सुत्रसंचलन महादेव भुजबळ व दत्तात्रय चव्हाण यांनी केले. आभार महादेव भुजबळ यांनी मानले.