महादेवांचा सर्वात मोठा उत्सव ‘महाशिवरात्री’

0

शरद भालेराव

हिंदु बांधवांचा एक पवित्र सण जो अतिशय भक्तिभावाने सर्वत्र साजरा करण्यात येतो, तो म्हणजे ङ्गमहाशिवरात्रीफ. हा उत्सव माघ कृष्ण चतुर्दशी यादिवशी येतो. इंग्रजी महिन्यानुसार हा उत्सव बहुदा फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येतो. सर्व देवांमध्ये भगवान महादेव अर्थात शंकराचे महत्व सर्वाधिक आहे. हा दिवस अत्यंत पवित्र वातावरणात साजरा केला जातो. अशातच भारतभरात 21 फेब्रु. रोजी महाशिवरात्री साजरी होत आहे. माघ कृष्ण चर्तुदशी ही तिथी ‘महाशिवरात्री’ म्हणून ओळखली जाते. देवांचे देव आणि तिन्ही लोकांचे स्वामी महादेवांचा हा सर्वात मोठा उत्सव असतो. अशी मान्यता आहे की, यादिवशी भगवान शंकर पृथ्वीच्या अधिक जवळ येतात. तमोगुणांचे ते प्राशन करतात. पण यादिवशी मात्र ते विश्रांती घेतात. म्हणून ‘महाशिवरात्री’ हा दिवस भगवान शंकराचा सगळ्यात आवडता दिवस असतो. काही जणांना दर सोमवारी शिवाची उपासना करणे शक्य नसते किंवा अनेकांना 16 सोमवारांचे व्रत करता येत नाही. तेव्हा महाशिवरात्रीच्या एका उपवासाने या व्रताचे फळ मिळते. यादिवशी भक्तीभावे शिवाची आराधना केल्यास भगवान शंकर प्रसन्न होतात. शिवभक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, असे मानले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराची पूजा केल्यास अडीअडचणी दूर होतात, महादेव प्रसन्न होतात, अशी भाविकांची श्रध्दा आहे.

या दिवसाचे महत्व सांगत पुराणात अनेक कथा सांगितल्या जातात. ज्यावेळी समुद्र मंथन झाले, त्यात सृष्टीशी निगडीत सर्व महत्वपूर्ण गोष्टींची निर्मिती झाली. परंतु त्याचवेळी समुद्रमंथनातून हलाहल विष बाहेर आले. या विषात ब्रह्मांडाला नष्ट करण्याची ताकद होती. आणि या विषाला नष्ट करण्याची क्षमता केवळ भगवान शंकरामध्येच होती. त्यामुळे त्यांनी हे हलाहल विष प्राशन करून ब्रह्मांडाला वाचविले. पण विष प्राशन केल्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला. संपूर्ण देहाचा दाह होत होता. वैद्यांनी भगवान शंकरांना संपूर्ण रात्र जागून काढण्याचा उपाय सांगितला. सर्व देवांनी भगवान शिवांना बरे वाटावे म्हणून रात्रभर गायन आणि नृत्याची व्यवस्था केली. सकाळी महादेवांनी सर्वांना आशीर्वाद दिला. या संपूर्ण घटनाक्रमामुळे सृष्टी वाचली म्हणून या दिवसाला ङ्गमहाशिवरात्रीफ असे म्हटले जाते. अंगाच्या होत असलेल्या दाहमुळे भगवान शंकरांनी यादिवशी तांडव नृत्य केले होते. महाशिवरात्री यादिवशी भाविक संपूर्ण दिवस उपवास करतात. भगवान शंकरांचे शिवलिलामृत, महारूद्र, भजन, गायन आदींचे आयोजन केले जाते. भगवान शिवाचे दर्शन घेऊन त्यांचा कृपाप्रसाद मिळविण्याकरीता आराधना केली जाते. शंकराच्या मंदिरांमध्ये महाशिवरात्रीला भाविकांची प्रचंड गर्दी होेते. बारा ज्योर्तिलिंग ज्या-ज्या ठिकाणी आहे तेथे तर लाखोंच्या संख्येने भाविक महाशिवरात्रीला दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात. भगवान शंकराचे ज्या-ज्या ठिकाणी तिर्थक्षेत्र आहेत तेथे भव्य यात्रा भरतात. शिवशंकराला 108 बेल वाहुन शिवनामावली उच्चारली जाते. महाशिवरात्रीला काटेधोत्र्याचे फुल भगवान शंकराला वाहण्याची पध्दत आहे. विदर्भात घोंगलाचे फुल शिवाला वाहण्याची परंपरा आहे. शिवकृपा प्राप्त होण्यासाठी ‘ओम नमः शिवाय’ हा जप जास्तीत जास्त करावा, असे सांगितले जाते.

काही कथेनुसार यादिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता. महाशिवरात्रीविषयी आणखी कथा असल्या तरी काही लोक या दिवसाला ‘जलरात्री’ असेही संबोधतात. महाशिवरात्रीच्या अनेक दंतकथा असल्या तरी ‘महाशिवरात्री’चा दिवस शिवभक्तांसाठी महत्त्वाचा असतो. एका मान्यतेनुसार यादिवशी महादेवांनी शिवलिंगाचे रुप धारण केले होते. महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री 12 ते 3 या प्रहरात महादेवांचा जागर केला जातो. शंकराला बेलपत्र, रुद्राक्ष प्रिय आहेत. म्हणून त्यांना ते अर्पण केले जाते. यादिवशी शंकरांच्या पिंडीवर अभिषेक केला जातो. त्याला बेलपत्र पांढरी फुले, धोत्रा, आंबा यांची पत्री आणि भस्म अर्पण केला जातो. काही ठिकाणी गंगाजलाचा अभिषेकही केला जातो.

महाशिवरात्री म्हणजे शिवाची महान रात्र. हा भारतीय आध्यात्मिक कॅलेंडरमधील एक महत्वाचा सोहळा आहे. ही रात्र एवढी महत्वाची का आहे आणि आपण तिचा वापर कसा करून घेऊ शकतो, याविषयी माहिती जाणून घेणे गरजेचे आहे. भारतीय संस्कृतीत एकेकाळी वर्षभरात 365 सण साजरे केले जात होते. दुसर्‍या शब्दात सांगायचे झाल्यास त्यांना वर्षातील प्रत्येक दिवस साजरा करण्यासाठी काही ना काहीतरी कारण हवे असायचे. हे 365 सण विविध कारणांसाठी आणि जीवनातील विविध उद्देश डोळ्यासमोर ठेऊन साजरे केले जात होते. विविध ऐतिहासिक घटना, विजय किंवा जीवनातील विशिष्ट परिस्थिती उदा. पेरणी, लावणी आणि कापणी यासाठी ते साजरे केले जात होते. प्रत्येक परिस्थितीसाठी एक उत्सव होता. परंतु महाशिवरात्रीचे महत्व वेगळेच आहे.

प्रत्येक चंद्र महिन्यातील 14 वा दिवस किंवा प्रतिपदेच्या आधीचा दिवस शिवरात्री म्हणून ओळखला जातो. वर्षभर येणार्‍या बारा शिवरात्रींमध्ये फेब्रुवारी-मार्चमध्ये येणार्‍या महाशिवरात्रीला सर्वात अधिक आध्यात्मिक महत्व आहे. या रात्री पृथ्वीच्या उत्तर गोलार्धाची स्थिती अशी असते की, मनुष्यात नैसर्गिक ऊर्जेचा उद्रेक होतो. यादिवशी निसर्ग एखाद्या व्यक्तीला त्याच्या आध्यात्मिक शिखरावर ढकलत असतो. त्याचा वापर करून घेण्यासाठी या संस्कृतीमध्ये आपण रात्रभर सुरू असणारा उत्सव साजरा करायला सुरुवात केली. नैसर्गिक ऊर्जेच्या या उद्रेकाला योग्य दिशा देण्यासाठी रात्रभर सुरू असणार्‍या या उत्सवातील प्राथमिक आवश्यकता म्हणजे आपण आपल्या पाठीचा कणा ताठ ठेवून संपूर्ण रात्र न झोपता, जागे राहणे. अध्यात्माच्या मार्गावर असणार्‍या व्यक्तींसाठी महाशिवरात्र अतिशय महत्वाची आहे. कौटुंबिक व्यक्ती तसेच जगातील महत्वाकांक्षी लोकांसाठीही अतिशय महत्वाची आहे. कुटुंबात रममाण होणार्‍या व्यक्ती हा दिवस शंकराच्या लग्नाचा वाढदिवस म्हणून साजरा करतात. जी लोकं अतिशय महत्वाकांक्षी आहेत ते हा दिवस शिवाने त्याच्या सर्व शत्रुंवर मात केली म्हणून साजरा करतात. परंतु योगी व्यक्तींसाठी हा दिवस म्हणजे शिव कैलास पर्वताशी एकरूप झाले तो दिवस आहे. ते पर्वतासारखेच बनले. अतिशय स्थिर. योग परंपरेत, शिव देव म्हणून पूजले जात नाही तर त्यांना आदिगुरु, म्हणजे ज्यांच्यापासून योग विज्ञान उगम पावले ते प्रथम गुरु असे मानले जाते. हजारो वर्षे ध्यान केल्यानंतर एके दिवशी ते अत्यंत स्थिर बनले. तो महाशिवरात्रीचा दिवस आहे. त्यांच्यामधील सर्व हालचाल बंद झाली व ते संपूर्णतः स्थिर झाले. त्यामुळे योगी महाशिवरात्रीकडे स्थैर्याची रात्र या दृष्टीने पाहतात.

समजुती बाजूला ठेवून दिल्या तरीसुद्धा योग परंपरेत हा दिवस आणि रात्र महत्वाची मानली जाते. त्याचे कारण हा दिवस अध्यात्माची ओढ असणार्‍या व्यक्तींना प्रचंड संधी उपलब्ध करून देतो. आधुनिक विज्ञान अनेक टप्प्यांमधून पुढे गेलेले आहे आणि आज या निष्कर्षापर्यंत पोहोचलेले आहे की, ज्याला तुम्ही जीवन असे म्हणता. तुमच्या अस्तित्वाबद्दल माहिती असणारी प्रत्येक गोष्ट, तुम्हाला विश्व आणि आकाशगंगा म्हणून माहिती असणारी गोष्ट, या सर्व गोष्टी एकच आहेत. त्या लक्षावधी मार्गांनी प्रकाशित होतात, हे आज सिद्ध झालेले आहे. प्रत्येक योगीमध्ये हे वैज्ञानिक सत्य म्हणजे अनुभवात्मक सत्यता आहे. ‘योगी’ या शब्दाचा अर्थ ज्याला या एकरूपतेचा साक्षात्कार झालेला आहे अशी व्यक्ती. म्हणजे अथांगतेची माहिती करून घेण्यासाठी उत्सुक असणे, अस्तित्वातील एकत्व जाणून घेण्याची उत्सुकता म्हणजे योग. त्याचा अनुभव घेण्याची संधी महाशिवरात्रीची रात्र उपलब्ध करून देते.
……………….