महानंदचा दुग्धपदार्थ उत्पादनासाठी स्वतंत्र प्रकल्प

0

मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाच्या (महानंद) दुग्धपदार्थ नि‌र्मिती प्रकल्पाचे विस्तारीकरणाचे काम मार्गी लागले आहे. महानंद दुग्धशाळेकडे दुग्धपदार्थ उत्पादनासाठी स्वतंत्र व्यवस्था नव्हती. मात्र दूध महासंघाने दुग्धपदार्थ उत्पादनासाठी स्वतंत्र प्रकल्प उभारला असून या प्रकल्पाची क्षमता आठ मेट्रिक टनावरून आता २० मेट्रिक टन होणार आहे. सुमारे १९ कोटी रुपयांच्या या विस्तारीकरण प्रकल्पासाठी सरकार व लाभार्थी संस्था यांनी प्रत्येकी ५० टक्के निधी दिला आहे.

राष्ट्रीय कृष‌ी विकास योजनेच्या विशेष योजनेंतर्गत राष्ट्रीय पूरक प्रथिने निर्माण कार्यक्रमांतर्गत मुंबईतील महानंदच्या दुग्धपदार्थ निर्मिती प्रकल्पाच्या विस्तारीकरणाच्या प्रस्तावास मान्यता मिळाली आहे. दही, लस्सी, मसाला छास, सुगंधी दूध अशा पदार्थांचे एकूण २० मेट्रिक टन उत्पादन आता महानंदला शक्य होणार आहे. दुग्ध पदार्थांचा खप वाढल्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या आहारात प्रोटीनचे प्रमाण वाढणार असून केंद्र शासनाचे प्रोटीन इनटेकचे उद्दिष्ट पूर्ण होण्यास चालना मिळेल अशी माहिती महानंद दूध महासंघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे यांनी दिली. नवीन प्रकल्पामुळे मे २०१६ च्या तुलनेत मे २०१७ मध्ये विक्री वाढली आहे. त्यामुळे मागणी वाढली तरी त्याचा पुरवठा करणे आता शक्य होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

शेतकऱ्याना फायदा देण्याचा प्रयत्न
नवीन दुग्धपदार्थ प्रकल्पामुळे बाजारपेठेतील वाढीव मागणी पूर्ण करणे सहज शक्य होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून जास्तीत जास्त दूध खरेदी करणे दूध महासंघास शक्य होणार आहे. यामुळे शासन व सहकार क्षेत्रासही मजबुती मिळणार असल्याची माहिती दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी दिली.