महानंदचे आरेमध्ये विलीनीकरण!

0

मुंबई : गेली अनेक वर्षे आर्थिक अनियमिततेमुळे डबघाईला आलेल्या महानंद सहकारी दुग्ध विकास संस्थेचे आरेमधे विलीनीकरण करण्याचा निर्णय अखेर राज्य सरकारने घेतला आहे, यासंबंधीचा प्रस्ताव मत्स्य आणि पशुसंवर्धन खात्याचे सचिव विकास देशमुख तयार करत असून येत्या 15 दिवसांत हा प्रस्ताव ते या खात्याचे मंत्री महादेव जानकर यांच्याकडे सुपुर्द करणार आहेत. त्यानंतर मंत्रीमंडळाच्या बैठकीसमोर हा विलीनीकरणाचा प्रस्ताव ठेवण्यात येणार असल्याचे महादेव जानकर यांनी दैनिक जनशक्तिशी बोलताना सांगितले. महानंदच्या कर्मचार्‍यांना या विलीनीकरणानंतर राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागात सामावून घेणार असल्याचेही जानकरांनी यावेळी सांगितले.

प्रियंका चोप्रा ब्रँन्ड अ‍ॅम्बसिडर
महानंदच्या विलीनीकरणची प्रक्रीया सुरु होताच जानकर यांनी अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिची भेट घेतली, आरे हा राज्याच्या दुधाचा एकच ब्रॅन्ड झाल्यानंतर प्रियांका चोप्रा ही आरेची ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसिडर असणार आहे. आरेच्या सर्व उत्पादनांची जाहिरात करताना प्रियांका चोप्रा हिने विनामुल्य काम करण्याचे मान्य केले आहे. तर अभिनेता अक्षय कुमार यांनी देखील मदत करण्याचे मान्य केले आहे.

विलीनीकरणाला व्यवहार्य नसल्याचे राजू शेट्टींचे मत
25 जुलैला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व शासकीय आणि खासगी सहकारी दुध संस्थांची बैठक बोलवली होती, त्यात मुख्यमंत्र्यांनी ही प्रस्तावीत योजना जाहीर केली. या बैठकीला राज्यांचे दुग्ध मंत्री महादेव जानकर आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यासह सहकार विभागाचे प्रतिनिधी म्हणून खासदार राजु शेट्टी आणि राज्यातील सगळ्या दुग्घविकास संस्थांचे महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. नुकतेच दुध खरेदीसाठी 27 रुपये दर शासनाने जाहीर केला होता, तो बर्‍याच दुध संस्था देत नाहीत, सगळ्यांनी देणे बंधनकारक करावे याकडे आधी सरकारने लक्ष द्यावे, महानंदचे आरेमध्ये विलीनीकरण करण्याचे नंतर पहावे, असे सांगताना खासदार राजु शेट्टी यांनी महानंद आणि आरे यांच्याकडे गावागावात यंत्रणाच नाही, त्यामुळे हे विलीनीकरण व्यवहार्य नसल्याचे मत व्यक्त केले.