महानगरपालिका प्रशासकीय इमारत अस्वच्छ

0

जळगाव। जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी महानगरपालिकेत प्रभारी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील अस्वच्छेतवर लक्ष केंद्रीत करून शहरात स्वच्छता कशी राखली जाईल याकडे जातीने लक्ष घातले आहे. यात त्यांनी प्रत्येक वार्डांत भेट देवून स्वच्छतेची मोहीम आखली आहे. या मोहिमेअंतर्गत आज दुपारी बारा वाजता महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीची पाहणी केली. या पहाणती त्यांना सर्व विभागात अस्वच्छता तसेच अस्ताव्यस्त पडलेल्या सामानाचे दर्शन झाले. यावेळी निंबाळकर यांनी सर्व विभाग प्रमुखांना आठ दिवसात प्रत्येक मजल्याची स्वच्छता करा तसेच कामात सुधारणा करा अन्यथा कारवाई केली जाईल असा सज्जड इशारा दिला आहे. उपमहापौर ललित कोल्हे यांनी काही दिवसांपूर्वी आरोग्य विभागाची बैठक घेवून महानगरपालिकेच्या सतरा मजली प्रशासकीय इमारतीची स्वच्छता करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर आज उपमहपौर कोल्हे यांनी महापौर नितिन लढ्ढा, जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त निंबाळकर, भाजपा गटनेते सुनील माळी यांच्यासोबत सतरा मजली इमारतीची पाहणी केली.

कर्मचारी ठिकाणावर नाही
पाहणी दरम्यान मनपाच्या एका मजल्यावरील विभागी कार्यालयात गेले असता तिथे एक ही कर्मचारी अढळून आला नाही. त्यातच विभाग प्रमुख देखील हजर नसल्याने त्वरित माहिती घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या सुचना केल्या. दरम्यान सहाव्या मजल्यावरील गाळे मिळकत विभागात गेल्यावर किती थकबाकी, गाळ्यांतून किती उत्पन्न मिळेल याची माहिती महापौर लढ्ढा यांना विचारली. यावेळी महापौरांनी सर्व माहिती देत भाडे थकबाकी व लिलावातून मोठे उत्पन्न मिळेल याची माहिती दिली.

छतापासून पहाणीस सुरूवात
शहरातील अस्वच्छतेच्या मुद्यावरून प्रभारी आयुक्त निंबाळकर यांनी शहरातील वॉर्डांना भेट देवून पाहणी करण्याचे काम सुरूच आहे. निंबाळकर यांनी स्वच्छतेची पहाणी करतांना गोलाणी, फुले मार्केटमधील अस्वच्छता आढळल्याने गोलाणी मार्केटमधील गाळेधारकांना स्वच्छता राखण्यास भाग पाडले आहे. यातच आज गुरूवार 3 ऑगस्ट रोजी महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीची आयुक्तांनी अचानक स्वच्छतेची पाहणी केली. या पाहणीची सुरवात प्रशासकीय इमारतीच्या छतापासून सुरू करत ती थेट तळमजल्यापर्यंत एक एक मजला पायी उतरत पहाणी केली.

भंगार विकून टाकण्याची सूचना
आयुक्तांच्या या पहाणीत बहुतांश मजल्यांवर अस्वच्छता दिसून आली तर काही विभागाच्या हॉलमध्ये मोठ्या प्रमाणात भंगार साहित्य, जुन्या फाइली, कागदपत्रे हे अस्ताव्यस्त परिस्थिती धुळखात पडलेले दिसून आले. तर एका विभागात एक ही कर्मचारी व विभाग प्रमुख नसल्याने संबंधित अधिकारीला माहिती काढण्याची सुचना केल्या. दरम्यान, पाहणी दरम्यान अनेक विभागात भंगार खुर्च्या टेबल, जप्त केलेले साहित्य आदी अढळून आले. तसेच शासकीय वस्तू भंगार झालेल्या अढळून आल्या. या वस्तू विकून टाका किंवा दुसर्‍या गोडाऊन मध्ये जाऊ द्या असे सुचना निंबाळकर यांनी दिल्यात.

बारनिशी तिसर्‍या मजल्यावर शिप्ट
महानगरपालिकेच्या तळमजल्यावरील बारनेशी विभागात आयुक्तांनी स्वच्छतेची पाहणी केली असता तेथे पावसाचे पाणी साचलेले दिसून आले. तसेच तळमजल्यावर कोंदट वातावरण, दुर्गंधी येत असल्याने विभागातील कर्मचारी संजय ठाकूर यांना अस्थवाईकपणे विचारणा केली. यात निंबाळकर यांनी ठाकूर यांना कसे काय दिवसभर बसतात अशी विचारणा केली. यावेळी संजय ठाकूर यांनी तिसर्‍या मजल्यावरील जन्ममृत्यू दाखला विभाग असून तेथे जागा असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी आयुक्त निंबाळकर यांनी ठाकूर यांच्या सोबत जावून जागेची पाहणी करत उद्या शुक्रवार 4 ऑगस्टपासून तिसर्‍या मजल्यावर बारनिशी विभागासाठी जागा देण्याचा सूचना संबंधितांना देण्यात आले आहे.