जळगाव: घोटाळ्यांनी बरबटलेल्या जळगाव महानगरपालिकेत पून्हा प्लास्टिकचा घोटाळा झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दोन वर्षापूर्वी प्लास्टिक बंदीच्या आदेशाची मनपा हद्दीत अमंलबजावणी करण्यासाठी आरोग्य विभागातर्फे कारवाईची मोहीम सुरु करण्यात आली होती. प्लास्टिकवर कारवाई केल्यानंतर जप्त करण्यात आलेला माल परस्पर विकून कोट्यावधी रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार समोर येत आहे. तसेच तसेच कारवाई न करण्यासाठी प्लस्टिक विक्रेत्यांकडून दरमहा 85 हजार रुपयांचा हप्ता आरोग्य विभागातील एक अधिकारी घेत असल्याचा खळबळजनक आरोप कर्मचारी आनंद सोनवाल यांनी करुन त्याबाबतच्या आडीओ क्लीप उपमहापौरांना दिल्या आहेत. उपमहापौरांनी चौकशी करुन संबधितांवर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.
आडीओ क्लीपमुळे खळबळ :
दोन वर्षापूर्वी प्लास्टिक विक्रेत्यांच्या गोडाऊनवर छापे टाकून 40 टनापर्यंतचा माल जप्त केला होता. या जप्त केलेल्या मालाची नियमानुसार विल्हेवाट न लावताच मनपा आरोग्य विभागाच्या संबधित अधिकारी व कर्मचार्यांनी हा माल पुन्हा विक्री करुन कोट्यावधी रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार समोर येत आहे. तसेच जप्त केलेल्या मालाचे प्रमाण कमी दाखवून मनपा प्रशासनाकडे केवळ 70 हजार रुपयांचे बिले दाखविली असल्याचेही उपमहापौरांच्यासमोर आनंद सोनवाल यांनी सांगितले.बैठकीला उपमहापौर डॉ.अश्विन
सोनवणे यांच्यासह नगरसेवक अॅड.दिलीप पोकळे, सुरेश सोनवणे, डॉ.चंद्रशेखर पाटील, मनोज काळे ,उपायुक्त मिनीनाथ दंडवते, आरोग्य अधिकारी डॉ.विकास पाटील उपस्थित होते. यावेळी आरोग्य विभागाचे युनिट हेड आनंद सोनवाल हे आपल्या तक्रारी घेवून आले. तक्रारी मांडत असताना त्यांनी मुख्य स्वच्छता निरीक्षक एस.बी.बडगुजर यांच्यावर आरोप करत, काही रेकॉर्डींग उपमहापौरांसमोर सादर करुन खळबळ उडवून दिली. त्यानतंर उपायुक्त दंडवते व आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील यांच्यातील मतभेदांमुळे अनेक धक्कादायक प्रकार देखील समोर आले आहेत.
आनंद सोनवाल यांचा आरोप
शहरातील काही मार्केटमधील प्लास्टिक विक्रेत्यांवर करवाई न करण्याचा बोलीवर दर महिन्याला या सर्व दुकानदारांकडून बडगुजर हे 85 हजार रुपये घेत असल्याची माहिती सोनवाल यांनी उपमहापौरांना दिली. तसेच बडगुजर यांनी स्वत:ची कॅबीन बनवून घेतली आहे. स्वत:च्या खासगी वाहनावर मनपा चा चालक ठेवला असल्याचे सोनवाल यांनी सांगितले. तसेच स्वत:चे वाहन मनपा कर्मचार्याकडून धुवून घेत असल्याचा आरोपही सोनवाल यांनी केला आहे.