महानगरपालिकेच्या व्यापारी संकुलांमध्ये बेशिस्त पार्कींग!

0

जळगाव। महानगर पालिकेच्या प्रशासकीय इमारतीत बेशीस्त होणारी वाहनपार्कींग रोखण्यासाठी प्रशासनातर्फे वाहनतळावर पट्ट्या आखुन देण्यात आल्या आहेत. याचा परिणाम चांगला झाला असून प्रशासकीय इमारतीत होणारी बेशीस्त वाहतुक रोखण्यात यश मिळाले आहे. याप्रमाणेच शहरातील महानगर पालिकेच्या व्यापारी संकुलांत वाहनांची पार्कींग व्यवस्थीत करण्यात येत नसल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी तर व्यापारी संकुलाता वाहने उभी न करात संकुलाच्या बाजुला असलेल्या रस्त्यांवरच पार्कींंग करण्यात येत आहे. यातून वाहतुकीला देखील अडथळा निर्माण होत आहे.

गोलाणीत बेशिस्त पार्कींग
गोलाणी मार्केट हे मोबाईल मार्केट म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच या मार्केटमध्ये विविध स्पर्धा परीक्षेचे क्लासेस आहे. या क्लासमध्ये येणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या देखील मोठी आहे. गोलाणी मार्केटमध्ये यासोबतच इतर व्यवसायीक व तळमजल्यावर भाजीपाला मार्केट आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मार्केट असल्याने नागरिकांची येथे नेहमी गर्दी असते. पार्कींगसाठी जागा असतांना बेशिस्तपणे वाहनपार्क करण्यात येत असल्याने रस्त्यांवरच वाहन पार्कींग करावी लागत आहे.

सम,विषमतारखेनुसार पार्कींगची मागणी
शहरातील स्वच्छतेचा प्रश्‍न मार्गी लागत असतांना बेशीस्त पार्कींगची समस्या भेडसावतांना दिसत आहे. शहरात सम, विषम तारखेनुसार पार्कींग करण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. सम, विषम तारखेच्या पार्कींगचे काही भागात बोर्ड लावण्यात आलेले आहेत. परंतु, याची योग्य ती अंमलबजावणी करण्यात येत नसल्याने पार्कींगची समस्या बिकट बनली आहे. व्यापारी संकुलांमध्ये वाहन पार्कींग करतांना बेशीस्त वाहन पार्कींग करणार्‍यांवर कोणतीही कारवाई होतांना दिसत नाही.

कायम स्वरूपी सुरक्षारक्षकाची नेमा
सुरक्षा रक्षक नसल्याने व्यापारी संकुलांमध्ये चोर्‍यांचे प्रमाण वाढले आहे. काही नागरिक आपले वाहन पार्कींगमध्ये लावून खरेदीसाठी व्यापारी संकुलांत गेल्यावर त्यांच्या वाहनातील पेट्रोल चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. महागनर पालिकेने व्यापारी संकुलांमध्ये कायमस्वरूपाचा सुरक्षा रक्षक नेमावा अशी मागणी नागरिक करीत आहेत. पार्कींगची समस्या सोडविण्याकडे महानगर पालिका प्रशासनाने लक्ष देवून सुरक्षर रक्षक नेमल्यास वाढणार्‍या चोर्‍यांचे प्रमाण कमी होणार आहे.