जळगाव । महानगर पालिकेच्या महासभा तसेच स्थायी सभांच्या कामकाजाचे थेट प्रेक्षपण करण्याची माणगी जळगाव जिल्हा जागृत जनमंचद्वारे आयुक्तांना शनिवारी निवेदन द्वारे केली आहे. महानगर पालिका ही नागरीकांच्या सोयीसुविधांसाठी चालवली जात असल्याने महासभेतील सत्य नागरीकांसमोर यावे यासाठी महासभेचे थेट प्रेक्षपणाची मागणी केली आहे. नगरसेवक व अन्य पदाधिकारी वैयक्तीक स्वार्थासाठी लढत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. नागरी योजनांमधून स्वतःचे आर्थिक हित साधत आहेत.
भ्रष्टाचाराविरोधातील चर्चा बंद पाडतात
कामाचे मक्तेदारीसाठी आधिकार्यांवर दडपण आणतात, भ्रष्टाचाराविरोधातील चर्चा बंद पाडतात, भ्रष्ट कर्मचारी व नगरसेवकांचा बचाव करीत असतात, कामकाज ऐवजी खानपानवर वेळ वाया घालवत असतात. निधीचा अपहार करून फस्त झाल्यावर त्याची वाच्यता करण्यात येते, नागरिकांना माहिती देण्यासाठी क्षेत्रसभा घेत नाहीत असे देखील पत्रकात नमुद करण्यात आले आहे. यातून सोयीसुविधांचे आयोजन होण्याऐवजी अपहाराचे नियोजन होत आहे. महासभा, स्थायी सभांचे थेट प्रेक्षपण केल्याने निवडून दिलेल्या नगरसेवकांचे मुल्यमापन नागरीक करू शकतील. विधानसभा व लोकसभा कामकाजाचे थेट प्रेक्षपण केले जाते त्याचधर्तीवर महानगर पालिकेतील सभांचे थेट प्रक्षेपण करण्यात यावे असे जळगाव जिल्हा जागृत जनमंचचे शिवराम पाटील, अनील नाटेकर, गुरूनाथ सैंदाणे यांनी निवेदनाद्वारे आयुक्तांना मागणी केली आहे.