जळगाव । महानगरपालिका कर्मचार्यांसाठी जीएसटी (वस्तू व सेवा कर) व टीडीएस कार्यप्रणालीबाबत मंगळवार 22 ऑगस्ट रोजी प्रशासकीय इमारतीच्या दुसर्या मजल्यावरील सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वस्तू व सेवाकर अधिकारी एस. बी. परदेशी यांनी जीएसटी कार्यप्रणालीबाबत सविस्तर माहिती सांगून मार्गदर्शन केले. परदेशी यांनी जीएसटी कार्यप्रणाली म्हणजे काय? त्यामधील तरतुदी, महापालिकेचे कामकाज करताना त्याची कशाप्रकारे अंमलबजावणी करावी, याची सविस्तर माहिती दिली.
यामध्ये महापालिकेच्या विविध निविदा प्रक्रियेमध्ये जीएसटी नोंदणीकृत ठेकेदारांना सहभागी करून घेणे मनपाच्या हिताचे असणार आहे. त्यामुळे वस्तू अथवा सेवा पुरवणारी संस्था जीएसटी रजिस्टर असावी, जीएसटी पद्धतीतील बिलाची रचना आदीकरिता जीएसटी आकारणीसंबंधी मार्गदर्शन केले. तसेच टीडीएस कार्यप्रणालीबाबतची यावेळी माहिती देण्यात आली. कार्यशाळेस मुख्य लेखाधिकारी चंद्रकांत वांद्रे, शहर अभियंता सुनील भोळे, पाणी पुरावठा अधिकारी डी. एस. खडके यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.