महानगरपालिकेत 962 पदे लॅप्स

0

प्रथमच आकृतीबंध ; 167 पदांसह वैद्यकीय अधिकार्‍यांच्या पदांसाठी प्रस्ताव

जळगाव-महानगरपालिकेच्या मंजूरपदांसह रिक्त पदे भरण्यासाठी प्रशासनाने प्रथमच आकृतीबंध तयार केला आहे. मनपात एकूण 2830 पदांपैकी 962 पदे व्यपगत (लॅप्स) होणार असून नव्याने 167 पदांची नव्याने निर्मिती केली जाणार आहे. आकृतीबंधबाबत सोमवारी नगरविकास विभागात बैठक झाली.दरम्यान,अत्यावश्यक सेवा म्हणून वैद्यकीय अधिकार्‍यांची पदे प्रस्तावित करण्याची सूचना नगरविकास विभागाने मनपा प्रशासनाला दिली आहे.

2003 नंतर प्रथमच आकृतीबंध

जळगाव महानगरपालिका 2003 मध्ये अस्तित्वात आली.त्यानंतर प्रथमच आकृतीबंध तयार करण्यात आला आहे. सामान्य प्रशासन 1222,महसूल 160,लेखाविभाग 25,अभियांत्रिकी 771,आरोग्य 424,अग्निशमन 60 आणि क्रीडा 1 असे एकूण 2663 पदे मंजूर आहेत.त्यानंतर 1129 पदे प्रस्तावित करण्यात आली.त्यामुळे 2850 पदे झालीत.मात्र काही पदे कालबाह्य झाल्यामुळे 962 पदे व्यपगत (लॅप्स) होणार आहेत. त्यामुळे आता 167 पदांसाठी नव्याने प्रस्तावित करण्यात आले आहे.

आकृतीबंधाचा 2017 मध्ये केला होता प्रस्ताव

मनपात अनेक जागा रिक्त असल्यामुळे नवीन पदनिर्मितीसाठी 2017 मध्ये आकृतीबंध तयार करण्यात आला आहे. आकृतीबंध तयार केल्यानंतर 23 जून 2017 मध्ये स्थायीसभेने तर 16ऑक्टोबरमध्ये महासभेने मंजुरी देवून शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ठरावानंतर आकृतीबंधचा प्रस्ताव 20 नोव्हेंबर 2017 मध्ये शासनाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला होता.मात्र त्या प्रस्तावात त्रुटी असल्याचे शासनाने मनपाला कळविले होते. त्रुटींची पूर्तता करुन 6 जून 2019 मध्ये पून्हा शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला.

अत्यावश्यक पदे प्रस्तावित करण्याची सूचना

आकृतीबंधानुसार 1129 पदे प्रस्तावित करण्यात आले होते.मात्र 962 पदे व्यपगत (लॅप्स)होणार असल्याने केवळ 167 पदे नव्याने प्रस्तावित करण्यात आली आहेत.यासंदर्भात सोमवारी नगरविकास विभाग मुंबई येथे बैठक झाली.या बैठकीला मनपा उपायुक्त अजित मुठे उपस्थित होते.उपायुक्त मुठे यांनी आकृतीबंधबाबत माहिती दिल्यानंतर 167 पदांव्यतिरिक्त अत्यावश्यक सेवा म्हणून वैद्यकीय अधिकार्‍यांची किती पदे आवश्यक आहे.याची माहिती घेवून नव्याने प्रस्ताव तयार करण्याची सूचना नगरविकासविभागाने मनपा प्रशासनाला दिली आहे.