प्रवाशांना दिलासा ; माजी मंत्री एकनाथराव खडसेंसह लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश
भुसावळ- जयपूर-हैद्राबाद सुपरफास्ट एक्सप्रेसला मलकापूर येथे थांबा मिळाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे तर अप व डाऊन महानगरी एक्स्प्रेसलाही रावेर रेल्वे स्थानकावर थांबा मिळाल्याने प्रवाशांची मोठी सोय झाली आहे.
अजमेर जाणार्या भाविकांची सोय
जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्यातील मुस्लिम भाविकांना अजमेर येथे जाण्यासाठी जयपूर-हैद्राबाद सुपरफास्ट ही गाडी अत्यंत सोयीची असल्याकारणाने ह्या गाडीला भुसावळ येते थांबा मिळण्याची मागणी होत होती परंतु तांत्रिक कारणामुळे भुसावळ येथे थांबा शक्य नव्हता. त्यामुळे खासदार रक्षा खडसे यांनी वरणगाव आणि मलकापूर येथे थांबा मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करत होत्या. 12719 जयपूर-अजमेर-हैद्राबाद सुपरफास्ट एक्सप्रेस गाडीला गुरुवारी आणि शनिवारी दुपारी 2 वाजून 7 मिनिटानी थांबा तसेच 12720 हैद्राबाद जयपूर सुपरफास्ट एक्सप्रेस गाडीला मंगळवारी आणि गुरुवारी सकाळी 6 वाजून 54 मिनिटांनी थांबा मिळाला आहे. 17623 हुजूर साहेबब नांदेड श्री गंगानगर एक्सप्रेसला मंगळवारी दुपारी 3 वाजून 26 मिनिटांनी मलकापूर येथे थांबा तर 17624 श्री गंगानगर हुजूर साहेब नांदेड एक्सप्रेसला रविवारी रात्री 7 वाजून 50 मिनिटांनी मलकापूर येथे थांबा मिळाला आहे.
महानगरीला अखेर रावेरला थांबा
11093 डाउन महानगरी एक्सप्रेसला रावेर येथे सकाळी आठ वाजून सतरा मिनिटांनी थांबणार असून अप 11094 महानगरी एक्सप्रेस ही गाडीला सकाळी पाच वाजून 30 मिनिटांनी रावेर स्थानकावर थांबणार असल्याने विद्यार्थी व नोकरदारांना भुसावळसह जळगाव जाण्यासाठी मोठी सोय झाली आहे. येत्या 20 जानेवारीला सकाळी 8 वाजून सतरा मिनिटांनी माजी महसूलमंत्री आमदार एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, आमदार हरीरभाऊ जावळे यांच्याकडून रावेर स्थानक येथे गाडीचे स्वागत होणार आहे आणि चालकांचा सत्कार करण्यात येणार आहे.