महानगरी एक्स्प्रेच्या धक्क्याने सिनियर सेक्शन इंजिनिअरचा मृत्यू

0

दुसखेडा तापी पुलावरील दुर्दैवी घटना ; हद्दीच्या वादात पंचनाम्यास विलंब

भुसावळ- अप महानगरी एक्स्प्रेसचा धक्का लागल्याने रेल्वेच्या इंजिनिअरींग विभागातील सिनिअर सेक्शन इंजीनिअर असलेल्या राजेश भीमराव माईकल (49) यांचा मृत्यू झाला. शनिवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास ही दुदैवी घटना दुसखेड्याजवळील तापी नदीवरील रेल्वेच्या पूलावर घडली. दरम्यान, एकीकडे अधिकार्‍याचा मृत्यू झाला असताना शहरातील तीनही पोलिस ठाण्यांमध्ये मात्र हद्दीच्या वादातून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यासाठी रेल्वे अधिकार्‍यांना तीनही पोलिस ठाण्यांचे उंबरठे झिजवावे लागले.

आवाज ऐकू न आल्याने ओढवला मृत्यू
महाराष्ट्र व मध्यप्रदेशाला जोडणार्‍या दुसखेडा गावाजवळील तापी नदीच्या रेल्वे पूलावर शनिवारी सकाळी रेल्वे रूळ देखभालीचे काम सुरू असतानाच दुपारी 12 वाजेच्या सुमारास एका लाईनीवरून रावेरकडे मालगाडी जात होती तर दुसर्‍या मार्गावर रावेरकडून महानगरी एक्स्प्रेस येत असताना मालगाडीच्या आवाजामुळे महानगरीचा आवाज माईकल यांना ऐकू आला नाही. वेगात आलेल्या महानगरीपासून वाचण्यासाठी माईकल हे रेल्वे लाईन ओलांडत असतांना त्यांना महानगरी एक्स्प्रेस गाडीचा डॅश लागल्याने ते खाली कोसळले. यावेळी महानगरी एक्स्प्रेसच्या चालकाने गाडी थांबवित यावेळी माईकल यांच्या सोबतच्या सहकार्‍यांनी त्यांना उचलत गाडीच्या एस- 5 या डब्यात चढवून तत्काळ कंट्रोलला माहिती दिली. रेल्वे स्थानकावर गाडी येताच माईकल यांना तातडीने रूग्ण वाहिकेद्वारे रेल्वे हॉस्पीटलला उपचारार्थ हलविण्यात आले मात्र अति दक्षता विभागात वैद्यकीय अधिकारी डॉ. गोरख कमलाकर यांनी त्यांना मृत घोषित केले.

हद्दीच्या वादात पंचनाम्यास विलंब
माईकल यांच्या मृत्यूनंतर नोंद करण्यासाठी कर्मचारी शहर पोलिस ठाण्यात आल्यानंतरही त्यांनी हद्द बाजारपेठ पोलिसांची सांगितली मात्र तेथे गेल्यानंतर त्यांनीदेखील ती हद्द आपली नसल्याचे सांगत तालुका पोलिसांकडे अंगुलीनिर्देश केला. अखेर शहर पोलिसांच्या हद्दीत रेल्वे हॉस्पीटलकडून दिलेल्या मेमोवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. शहर पोलिसांनी रीतसर पंचनामा करून वरणगाव ग्रामीण रूग्णालयात विच्छेदनासाठी पाठविला. दरम्यान, हॉस्पीटलमध्ये असलेल्या रेल्वे कर्मचार्‍यांमधून पोलिस प्रशासनाच्या कार्यपध्दतीबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.