जळगाव (राहुल शिरसाळे)। महानगर पालिकेच्या वाहन विभागावर अतिरिक्त कामांचा बोजा वाढला आहे. या अतिरिक्त कामांमुळे वाहन विभागातील कर्मचार्यांची तारांबळ उडत आहे. कमी कर्मचार्यांवर वाहन विभागाचा कारभार चालत आहे. या विभागात 47 कुशल अधिकारी कर्मचार्यांची आवश्यकता आहे. परंतु, वाहन विभागाकड केवळ 6 जणांवर चालत असल्याचे समोर आले आहे. वाहन विभागात अॅटो मोबाईल अभियंता विभाग प्रमुख असण्याची गरज असतांना विद्युत अभियंताच्या खांद्यावर विभाग प्रमुखाचा भार टाकण्यात आला आहे.
विभागप्रमुख आहेत प्रभारी
जळगाव महापालिकेकडे स्वमालकीची सुमारे 150 वाहने आहेत. या वाहनांची देखभाल दुरुस्ती, डिझेल व आईल पुरवठा, तपासणी, विमा अश्या विविध कामांची जबाबदारी वाहन विभागाकडे आहे. गेल्या दोन वर्षांपासून वाहन विभागाकडून कामांमध्ये चालढकल केल्याबाबत महासभा व स्थायी सभांमध्ये नगरसेवकांकडून ओरड होत आहे. वाहन विभागावर कामांचा ओव्हरलोड होत असल्याने कामांना विलंब होत आहे.
अपुर्या मनुष्यबळाने कामांचा ताण
या विभागाकडे 150 वाहनांचे नियोजन, त्यांची देखभाल दुरुस्ती, कालबाह्या वाहने निर्लेखीत करणे, दुरुस्तीसाठी पाठविणे, डिझेल व ऑईल देणे, डिझेल पंप सांभाळणे, पर्यायी वाहनांचे नियोजन करणे, चालकांचे नियोजन, वाहनांची तपासणी, फिटनेस तपासणी, विमा व कागदपत्रे करणे, नविन वाहनांची खरेदी अशी विविध कामे केली जातात. अपूर्या मुनष्यबळाअभावी कामांचा ताण पडत आहे.
विभागाला आवश्यक कर्मचारी
विभागासाठी शासनाच्या निर्णयानुसार 1 वाहन प्रमुख मेकॉनिकल अभियंता, 3 कनिष्ठ मेकॉनिकल अभियंता, 2 फोरमन, 2 हेड मेकॉनिक, 2 वाहन परिक्षक, 7 अॅटो मेकॉनिक, 4ऑटो इलेक्ट्रिशयन कारागीर, 2 डिझेल मेकॉनिक, 2 स्टोअर किपर, 5 लिपीक, 2 डिझेल पंपचालक, 2 वेल्डर, 2 टायर फिटर, 2 आईलमन, 3 गॅरेज हेल्पर, 4 स्वच्छक (यांत्रिक) व 3 शिपाई असे मनुष्यबळ आवश्यक आहे.