जळगाव : संत गाडगेबाबा महाराज पुण्यतिथीनिमित्त 20 डिसेंबर रोजी महापालिकेने शहरातील विविध क्षेत्रातील नागरिकांसह सुमारे 137 संस्थाच्या सहकार्यांने महास्वच्छता अभियान राबविणार आहे. या मोहिमेत महानगर पालिकेचे 2000 कर्मचार्यांसह विविध संस्थांचे 20 हजार स्वयंसेवक असे एकूण 22 हजार नागरिक सहभागी होणार आहेत. या मोहिमेसंदर्भांत नियोजनाची बैठक महापौर नितीन लढ्ढा यांच्या अध्यक्षतेखाली महानगर पालिकेच्या दुसर्या मजल्यावरील सभागृहात गुरूवार 15 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी स्थायी सभापती डॉ. वर्षा खडके, आयुक्त जीवन सोनवणे, उपायुक्त लक्ष्मीकांत कहार, नगरसचिव निरंजन सैंदाणे उपस्थित होते. तसेच महास्वच्छता अभियानाचे मुख्य समन्वय उदय पाटील, जैन इरिगेशन लि.चे प्रतिनिधी फारूख शेख आदी उपस्थित होते.
उपस्थितांनी दिल्या विविध सूचना
या बैठकीत 125 नागरिक उपस्थित होते. यात 84 एनजीओंचे प्रतिनिधींनी, 41 इतर संघटनांचे प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला होता. यावेळी महास्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी करण्यात येणार्या उपयायोजनांबाबत चर्चा केली. यावेळी उपस्थितांनी महानगर पालिकेचा उपक्रमाचे कौतुक करून हा उपक्रम दर सहा महिन्यांनी राबवावा अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच एक दिवसच स्वच्छता अभियान न राबविता एनजीओंने प्रभाग दत्तक घ्यावा अशी सूचना मांडण्यात आली. याप्रसंगी आयुक्त जीवन सोनवणे यांनी महानगर पालिकेकडे स्वच्छता करण्यासाठी सक्षम यंत्रणा आहे. प्रत्येक वार्डांत एक घंटागाडी व कचरा उचलण्यासाठी एक स्वतंत्र गाडी असल्याचा कार्यरत आहे. नागरिकांनी घंटागाडी व कचरा उचलणारी गाडी वेळेवर आली किंवा नाही यावर देखरेख करण्याची अपेक्षा व्यक्त केली. शहरातील इतर कामांपेक्षा स्वच्छतेसाठी महानगर पालिका दुप्पट खर्च करीत असल्याने नागरिकांनी शहरात कचरा वेळेवर उचलला जात नसेल तर महानगर पालिकेत तक्रार करावी असे आवाहन यावेळी आयुक्त सोनवणे यांनी केले.
जिल्हाधिकार्यांने शासकीय कर्मचार्यांना आवाहन
जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांनी सर्व शासकीय कार्यालयांतील कर्मचार्यांना महागनर पालिकेच्या महास्वच्छता अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या अभियानात जिल्हाधिकारी अग्रवाल ह्या स्वतः सक्रीय सहभाग घेणार आहेत. तसेच विद्यापीठाचे एक हजार कर्मचारी देखील सहभागी होणार आहेत. या बैठकीत श्री मोहन उद्योगाद्वारे महास्वच्छता अभियानात सहभागी होणार्या नागरिकांना प्रत्येकी 20 रूपयांला झाडू देण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच पंकज जैन यांनी 35 रूपयांला घमेली उपलब्ध करून देवू अशी माहिती दिली. महानगर पालिकेकडून शहरातील 37 प्रभागांमधील महत्त्वाचे आणि ब्लॅक स्पॉटची यादी तयार करण्यात आली आहे. या अभियानात सहभागी होणार्या नागरिक संस्थांच्या प्रतिनिधींना एक ठिकाण ठरवून देण्यात येणार आहे. या वेळी साफसफाई पूर्वीचा त्यानंतरचा एक फोटो व्हॉट्सअॅपवर मागवण्यात आला आहे. या अभियानात सहभागी होणार्या नागरिकांच्या मदतीसाठी पालिकेचे दोन कर्मचारी देण्यात येणार आहे. गटांद्वारे जमा करण्यात आलेला कचरा उचलण्यासाठी वाहन व्यवस्था करण्यात आली आहे.
137 संघटनांनी दिले सहभागाचे पत्र
महापालिकेने शहरातील विविध क्षेत्रातील नागरिक, राजकीय नेते पदाधिकारी, कार्यकर्ते, शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, डॉक्टरांची संघटना, वकिलांची संघटना, प्राध्यापक, कॉलेज शाळांमधील शिक्षक विद्यार्थी, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रोटरी, लायन्स, रोटरॅक्ट, एल. के. फाउंडेशन यासह विविध संघटना यांना सहभागाचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील सुमारे 22 हजार नागरिकांनी सहभागी होण्यासाठी फॉर्म भरून दिला आहे. महानगर पालिकेचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, कविवर्य ना.धों.महानोर, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, निवृत्त अधिकारी शिवाजी पाटील असणार आहेत.