जळगाव । मनपाचे सेवानिवृत्त कर्मचारी व ज्येष्ठ नागरिक अनिल नाटेकर यांचे खेडी शिवारातील राहते घर मनपाने कोणतीही पूर्वसुचना न देता जेसीबी लावून पाडले़ ही कारवाई सूडबुध्दीने करण्यात आली असल्याचा आरोप जळगाव जागृत मंचतर्फे महापौर नितीन लढ्ढा व आयुक्त जीवन सोनवणे यांना देण्यात आलेल्या पत्राव्दारे करण्यात आला आहे़ या पत्रात म्हटले आहे की, नाटेकर यांचे घर खेढी शिवार गट नं़ 48/1 प्लॉट नं़ 46 मध्ये 820 स्केअर फुट प्लॉटवर आहे़ सदर गट हा ग्रीन झोन असल्यामुळे बांधकाम परवानगी मिळालेली नाही़ नंतर 2012 मध्ये रेसिडेन्शनल झोन मध्ये रूपांतर झाले. नाटेकर यांनी ग्रीन झोन असतांना स्वत:च्या प्लॉटवर (हद्दीत) बांधकाम केले होते. परवानगी नव्हती, पण अतिक्रमण मुळीच नव्हते. रस्ते, रहदारी, सरकारी इमारत, कार्यालय अशी कोणतीही अडचण नसतांना केवळ सूडबुध्दीने नाटेकरांचे राहते घर पाडले. नाटेकर यांनी 24 वर्ष मनपाला आपली सेवा प्रदान केली. ते नियमित कर भरतात मात्र, कोणत्याही मुलभूत सुविधा मनपाने दिल्या नासल्याचा आरोप करण्यात आला आहे.
संघटनेला बदनाम करण्याचा मनपाचा प्रयत्न
मनपा शौचालय बांधकामास अनुदान देते तर दुसरीकडे शौचालय पाडते. अर्धवट घर पाडले असतांना नाटेकरांकडून मनपाच्या भ्रष्टाचाराविरूध्द तक्रारी करणार नाही, आंदोलन करणार नाही, असे लिहून घेवून घर पाडण्याचे षडयंत्र थांबविले. शहीद भगतसिंग कर्मचारी संघटना व जळगाव जिल्हा जागृत जनमंच ने मनपातील 3 कोटी 29 लाखाचा भ्रष्ट्राचार उघडकीस आणला़ त्यामुळे संघटनेला बदनाम करण्याचा प्रयत्न मनपाने केला़ मनपा अधिकार्यांच्या अतिक्रमणाला शय देण्यात येत आहे़ लोकशाही दिनाचे केवळ नाटक करतात, तक्रार केली तर म्हणे सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप केला जातो असेही पत्रात नमुद करण्यात आले आहे. पत्रावर शिवराम पाटील,डॉ. सरोज पाटील, गुरूनाथ सैंदाणे यांच्या स्वाक्षर्या आहेत़