जळगाव। महानिर्मितीने औष्णिक वीज निर्मिती संचामधून ५ मार्च २०२१ रोजी विजेच्या शिखर मागणीच्या कालावधीमध्ये सकाळी ८.१५ वाजता ८१०४ मेगावॅट वीज निर्मितीचा उच्चांक प्रस्थापित केला आहे.
महाराष्ट्र राज्यातील वीज ग्राहकांना कमीत कमी वीज दरामध्ये सातत्यपूर्ण वीज पुरवठा करण्याकरिता महानिर्मिती नेहमीच योगदान देत आहे. महानिर्मितीची एकूण स्थापित क्षमता १३१८६ मे वॅट इतकी आहे. त्यापैकी औष्णिक विद्युत क्षमता ९७५० मे वॅट इतकी आहे. आज महानिर्मितीच्या ७ औष्णिक वीज निर्मिती संचांमधून ८१०४ मेगा वॅट उच्चांकी तर एकूण ८६८० मेगावॅट वीज निर्मिती करण्यात यश मिळविले आहे. यामध्ये भुसावळ वीज निर्मिती केंद्र संच क्र. ४ व ५, चंद्रपूर संच क्र.८ व ९, खापरखेडा संच क्र.३ व ५ तसेच परळी संच क्र ६व ८ आणि पारस संच क्र.३ यांनी ९० टक्क्यापेक्षा अधिक प्लांट लोड फॅक्टर सह वीजनिर्मिती साध्य केली आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी कोळसा पुरवठा सुरळीत करण्यात मोठी भूमिका बजावली आहे. तसेच प्रभावी इंधन व्यवस्थापन, विविध उत्कृष्ट संचलन कार्य प्रणालीचा अवलंब करून कमीत कमी खर्चात महानिर्मितीच्या संचानी ही विक्रमी सातत्यपूर्ण कामगिरी साध्य करत वीज ग्राहकांना दिलासा दिला आहे. ऊर्जामंत्री व महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांच्या नेतृत्वाखाली महानिर्मितीने ही विक्रमी कामगिरी साध्य केली आहे. त्याबद्दल संचालक संचलन राजू बुरडे व कार्यकारी संचालक अभय हरणे यांनी सर्व कर्मचार्यांचे कौतुक केले आहे.