पुणे । पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय युवा केंद्र, विधी सेवा केंद्र यांच्या वतीने पथनाट्यांच्या माध्यमातून कायदेविषयक जनजागृती केली जाणार आहे. त्यासाठी शहरातील महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांच्या महापथनाट्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. ही स्पर्धा 20 ते 23 सप्टेंबर या कालावधीत होणार असल्याची माहिती पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पी.आर. अष्टुरकर यांनी दिली.
या स्पर्धेसाठी तांत्रिक समिती स्थापन करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या केन्युलॉ अकॅडमीचे प्राचार्य डॉ. रशीद शेख या समितीचे समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत. डीवायसीचे यशवंत मानखेडकर या समितीचे जिल्हा समन्वयक आहेत. तर टिमवी विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील या समितीचे सदस्य आहेत. समाजात सह कायदा मदतनीस तयार करणे, सामाजिक न्यायदानास प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहयोग करणार्या संस्थांना मार्गदर्शन व्हावे, यासाठी अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत.
50 संघांमधून 10ची निवड
सामाजिक बहिष्कार, संगणक विषयक गुन्हे, बालकामगार, कौटुंबिक हिंसाचार, स्त्री भ्रूणहत्या, लोकन्यायालयाची भूमिका आणि सहकायदा मदतनीसाची भुमिका या विषयांवर या स्पर्धेत पथनाट्य सादर करता येणार आहेत. यावेळी 50 संघांमधून चांगल्या 10 संघांची निवड केली जाईल. उत्कृष्ट 3 संघांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक देऊन चषकाने गौरविले जाणार आहे.