महापारेषणाच्या लाईनमनची आत्महत्या
भुसावळ शहरातील जामनेर रोडवरील बियाणी मिलिटरी स्कूलमागील घटना : आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात
भुसावळ : महापारेषण कंपनीत कार्यरत असलेल्या 41 वर्षीय लाईनमनने गळफास घेत आत्महत्या केली. शहरातील जामनेर रोडवरील बियाणी मिलिटरी स्कूलमागे ही घटना घडली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. प्रवीण दगडू सोनवणे (41, खडका एम.एस.ई.बी.क्वार्टर, बिर्ल्डींग नंबर एक, रूम नंबर चार) असे मयताचे नाव आहे.
बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
सोनवणे यांनी गुरुवार, 1 रोजी सकाळी साडेआठ वाजेपूर्वी बियाणी मिलीटरी स्कूलपाठीमागील वांजोळा-मिरगव्हाण शिवारातील एका लिंबाच्या झाडाला दोराने गळफास घेतला. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली. बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला तसेच सोनवणे यांची दुचाकी जप्त केली. भुसावळ बाजारपेठ पोलिसात वांजोळा पोलीस पाटील संतोष भिका कोळी यांनी खबर दिल्यानुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार माणिक सपकाळे करीत आहेत. दरम्यान, सोनवणे हे कर्जबाजारी झाल्याने त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा गावात आहे.