महापालिकांच्या शाळांमध्ये रंगतायेत आखाड पार्ट्या

0

पुणे : महापालिका प्रशासनाचे शाळांकडे दुर्लक्ष होत असून अनेक गोष्टी विद्यार्थ्यांना वेळेवर मिळत नाहीत, अशी वर्षानुवर्षे ओरड केली जाते. पण याही पलीकडे जात या शाळांमध्ये चक्क आखाड पार्ट्या रंगत असल्याची बाब सभासदांनी उघड केली आहे. महापालिका शाळांशी निगडीत विविध मुद्द्यांवरून मुख्य सभेत चर्चा करण्यात आली. यावेळी सभासदांनी आपापल्या प्रभागातील शाळांची दयनीय अवस्था मांडली. उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी सर्वात प्रथम हा मुद्दा उपस्थित केला.

सध्या संपूर्ण शहरात 337 शाळा असून त्यांमध्ये एक लाखाच्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र अद्यापही या शाळांना पुरेसे शिक्षक नाहीत. अस्वच्छता, शैक्षणिक साहित्याची नाही. यामुळे विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या सर्व मुद्द्यांवर तीन तासाहून अधिक काळ चर्चा करण्यात आली. डॉ धेंडे यांनी विवेकानंद शाळेत 300 विद्यार्थ्यांमागे दोन वर्गखोल्या आणि एक शिक्षक असल्याचे विदारक चित्र सांगितले. शाळेत दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला असतो याकडे त्यांनी लक्ष वेधले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सभासद दिलीप बराटे यांनी जून ते जून असे शैक्षणिक वर्ष असताना प्रशासन सहा महिन्यांच्या कालावधीकरिता शिक्षकांच्या नेमणुका कशा करते असा सवाल उपस्थित केला. माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी संतापून 200 शिक्षक कमी असतील तर शाळा कशाला चालवता असा प्रश्न विचारला. काँग्रेसचे सभासद अविनाश बागवे यांनी शाळांमधील शौचालयांची दूरवस्था असल्याचे सांगितले. स्थायी समितीने गुणवत्ता वाढीसाठी दिलेल्या 10 कोटींचे काय झालेे याची माहिती नसल्याचे ते म्हणाले. राष्ट्रवादीचे सुभाष जगताप यांनी याबाबत आयुक्तांनी तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी केली. एका वर्गात 8 विशेष विद्यार्थी बसवण्याचा नियम असताना महापालिका शाळांमध्ये 26 विद्यार्थी बसवले जात असण्यावर त्यांनी टीका केली. भाजपचे सभासद आनंद रिठे यांनी क्रीडा निकेतनमध्ये देण्यात येणार्‍या पोषण आहाराची गुणवत्ता तपासण्याची सूचना केली.

विशेष मुलांच्या प्रश्न गंभीर
शिवाजीनगर भागातील 14 क्रमांकाच्या विशेष मुलांच्या शाळेत 6000 रुपये प्रति महिना दरावर एक शिक्षिका सहा महिन्यासाठी घेण्यात आली आहे.26 मुलांमागे एक शिक्षिका असल्याने विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत असल्याचा मुद्दा स्थानिक सभासद आदित्य माळवे यांनी मांडला.

आवाज दाबला जातोय
डॉ धेंडे यांनी या विषय उपस्थित केल्यावर शिवसेनेचे गटनेते संजय भोसले यांनी या विषयावर बोलण्यास सुरुवात केली. मात्र ही लक्षवेधी सुरू असून चर्चा करू नये असे सांगत महापौरांनी बोलण्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे संतापलेल्या भोसले यांनी बोलू द्या, आवाज दाबला जातोय असे सांगत बोलण्यास सुरुवात केली.