महापालिका अधिकार्‍यांच्या दुर्लक्षपणामुळे गटारांवर अतिक्रमण

0

भिवंडी । भिवंडी महापालिका कार्यक्षेत्रात आरोग्य विभागावर शहर स्वच्छतेची मोठी जबाबदारी असते. आरोग्य निरीक्षक, मुकादम, सहाय्यक मुकादम सफाई कामगारांकडून कामे करून घेण्यास असमर्थ ठरलेले आहेत. बहुसंख्य आरोग्य निरीक्षक हे भिवंडी महापालिका कार्यक्षेत्राबाहेर राहत असल्याने त्यांचे शहर स्वच्छतेकडे मुळीच लक्ष नाही. कधी त्यांच्या मनात आले तर एखादा फेरफटका मोटरसायकलवरून प्रभागात मारतात. प्रभागात स्वच्छता आहे किंवा नाही ती परिस्थिती मोटरसायकलवरून खाली उतरून पाहण्यासाठी त्यांना मुळीच वेळ नसतो. नेमका या संधीचा फायदा रस्त्यालगत असलेल्या गटारांवर खुलेआम अतिक्रमण करणारे घेत आहेत.

आरोग्य विभागाचा कार्यभार ज्या उपायुक्तांकडे आहे त्यांनी आपल्या वातानुकूलीत दालनातून बाहेर पडायला हवे पण तसे होत नाही. कारण बहुसंख्य उच्चपदस्थ अधिकारी हे शासनाकडून प्रतिनियुक्तीवर भिवंडी महापालिका प्रशासनावर पाठविण्यात आलेले आहेत. त्यांना शहर स्वच्छतेबाबत काहीही सोयरसुतक नसते. फक्त कार्यालयीन वेळेत येणे दोन चार कागदांवर सह्या करणे आणि सायंकाळी महापालिकेच्या वाहनातून आपापल्या घरी जाणे हा एक कलमी कार्यक्रम प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकार्‍यांचा दिसून येत आहे. आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी शहर स्वच्छता आराखडा तयार केला आहे. पण सदर आराखड्याचे काटेकोरपणे आरोग्य निरीक्षक यांच्याकडून पालन केले जात नाही त्याचा परिणाम शहरांत अस्वच्छतेवर होत आहे.

गटारांवर लावण्यात आलेल्या जाळ्या काढून त्यावर लाद्या बसविल्याने गटारांची स्वच्छता केली जात नाही. परीणामी पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहते आणि अशा गटारांतून डासांना उत्पत्तीसाठी पोषक वातावरण मिळते.

दुकानदारांचे फावले
रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारांवर दुकानदार आपला माल ठेवतात. गटारांवर उघडपणे अतिक्रमण करून रहदारीला मोठा अडथळासुद्धा दुकानदार निर्माण करतात. अतिक्रमण पथक आणि बांधकाम विभागातर्फे ज्या ज्या प्रभागांतील रस्त्यावर असलेल्या गटारांवर दुकानदारांनी अतिक्रमणे केलेली आहेत ती तातडीने हटविण्यासाठी कार्यवाही करायला हवी पण संबंधितांबरोबर अधिकारी, कर्मचारी यांचे छुपे साटेलोटे असल्याने सर्वजण त्याकडे दुर्लक्ष करतात.