पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या 2018-19 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाचे काम अंतिम टप्यात असून अखेरचा हात फिरवला जात आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर हे 15 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प स्थायी समिती समोर सादर करणार आहेत. दरम्यान, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे या नशीबवान असून त्यांना एका वर्षात दुसरा अर्थसंकल्प मांडण्याची संधी मिळणार आहे. महापालिकेचा गतवर्षीचा अर्थसंकल्प जेएनएनयुआरएम व केंद्र शासनाच्या इतर योजनांसह पाच हजार 100 कोटींचा होता.
शून्य तरतूद यंदापासून बंद
महापालिकेने 2018-19 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पासाठी दहा लाखांपर्यंतची कामे सुचविण्याचे आवाहन केले होते. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून 101 जणांनी कामे सुचवली आहेत. त्यामध्ये स्थापत्य, विद्युत आणि पाणीपुरवठा विषयक कामे आहेत. या कामांचा अर्थसंकल्पामध्ये समावेश होणार आहे. आगामी वर्षात शून्य तरतूद असलेले सर्व लेखा शिर्षक वगळण्यात येणार आहेत. जेवढ्या रकमेचे काम आहे. तेवढ्याच रकमेची निविदा काढायची, त्यासाठी तेवढीच रक्कम अर्थसंकल्पात ठेवावी, असे आदेश सर्व विभागप्रमुखांना दिले आहेत. त्यामुळे वाढीव, सुधारित खर्चाला आळा बसणार आहे. जेवढी कामे करायची तेवढ्याच कामांचा समावेश अर्थसंकल्पात करावा. अनावश्यक कामांचा करु नये. शून्य तरतूद अथवा टोकन हेडला यंदापासून मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे आहे त्याच कामावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
आयुक्त नवीन संकल्पना मांडणार
आयुक्त श्रावण हर्डीकर हे या अर्थसंकल्पात नवीन संकल्पना मांडणार आहेत. अर्थसंकल्पाच्या पुस्तकाचा आकार देखील लहान असणार आहे. अर्थसंकल्पाचे काम अंतिम टप्यात आहे. 15 फेब्रुवारी रोजी आयुक्त स्थायी समितीसमोदर अर्थसंकल्प सादर करणार आहेत. दरम्यान, स्थायी समितीतील आठ सदस्यांची फेब्रुवारी 2018 अखेर मुदत संपणार आहे. त्यामुळे नवीन सदस्यांसाठी 24 जानेवारी ’ड्रॉ’ काढला जाणार आहे. यामध्ये कोणत्या नगरसेवकांना समितीतून बाहेर पडावे, लागते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.