नागरिकांना नाहक त्रास; पैशांचा अपव्यय
निगडी : येथील बजाज अॅटोच्या बाजूच्या एलआयसी कॉर्नर ते निगडी चौक पदपथाचे पालिकेतर्फे नूतनीकरण करण्यात आले होते. परंतु, केबल टाकण्यासाठी पदपथाचा काही भाग पुन्हा रिलायन्स या खासगी कंपनीने खोदला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महापालिका आणि ठेकेदार यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याचे दिसून आले. मात्र याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. तसेच पैशांचा देखील अपव्यय होत आहे. कोणतेही नियोजन न करता दोन-दोन वेळा खोदाई केली जात असल्याबद्दल नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.
खासगी कंपन्यांमार्फत केबल टाकणे सुरू
पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागात खासगी कंपन्यांमार्फत भूमिगत केबल टाकण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. या केबल कंपन्यांना खोदाईसाठी पालिकेने परवानगी दिली आहे. तसेच 24 तास पाणीपुरवठा योजनेचे देखील काम पालिकेचे सुरु आहे. त्यासाठी शहरातील विविध भागात रस्त्यांची खोदाई केली जात आहे. हे काम करत असताना पालिका आणि ठेकेदार यांच्यामध्ये समन्वय नसल्याचे पुढे आले आहे. निगडी येथील बजाज अॅटोच्या बाजूच्या एलआयसी कॉर्नर ते निगडी चौक पदपाथचे पालिकेतर्फे नूतनीकरण करण्यात आले होते. परंतु, केबल टाकण्यासाठी पदपथाचा काही भाग पुन्हा एका खासगी कंपनीने खोदला आहे. पदपथाची दोनदा खोदाई केली जात असल्यामुळे ठेकेदार आणि पालिका यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याचे दिसून येत आहे.
ठेकेदार पदपथाची दुरुस्ती करणार
केबलसाठी खोदाई करणारा ठेकेदार पदपथाची दुरुस्ती करुन देणार आहे. परंतु, ठेकेदाराकडून दुरुस्तीचे काम चांगल्या पद्धतीने केले जाईल का, तसेच यामुळे पैशांचा देखील अपव्यय होत आहे. यासाठी पालिका आणि ठेकेदार यांनी समन्वय ठेऊन कामे करावीत, अशी नागरिकांकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच निगडीतील अम्मा चौकातील चार दिवसांपूर्वी डांबरीकरण केलेला रस्ता देखील पुन्हा खोदला आहे. यामुळे नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. दरम्यान, खोदाई करताना पालिकेने संबंधित ठेकेदारांशी समन्वय साधावा. कुठेही दोनवेळेस खोदाई करण्याची वेळ देऊ नका, अशा कडक सूचना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिल्या आहेत. परंतु, त्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.