पिंपरी-चिंचवड : निगडीतील भक्ती-शक्ती चौकात उभारण्यात येणार्या उड्डाणपूल, ग्रेडसेपरेटरचे काम, ड्रेनेज लाईन, सेवा रस्ता, विद्युत विषयक कामे 72 कोटींमध्ये करण्याची तयारी ठेकेदाराने दर्शविली. मात्र, महापालिकेने अनुषंगिक कामांसाठी स्वतंत्र 18 कोटी का दिले? असा सवाल केल्यावर आयुक्तांनी त्याबाबात केलेला युक्तीवाद म्हणजे बेकादेशीर कामात त्यांचा सहभाग असल्याचा पुरावा आहे, असा आरोप करत माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी आयुक्तांच्या चौकशीची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
स्थायीच्या पदाधिकार्यांचीही चौकशी व्हावी
उड्डाणपूल आणि ग्रेडसेपरेटरच्या कामाच्या यापूर्वीच्या निविदाही अशाच ’लमसम’ पद्धतीने मागविण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे 103 कोटी खर्चाच्या कामाची निविदा निश्चित करण्यात आली, असे लेखी उत्तर आयुक्तांनी दिले आहे. तसेच ठेकेदार हे काम 90 कोटीत करून देणार असल्याने महापालिकेचा आर्थिक फायदा झाला आहे, असे गणितही आयुक्तांनी मांडले आहे. आयुक्तांनी असा युक्तीवाद करणे, म्हणजे या बेकायदेशीर कामात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असण्याचा पुरावा आहे. त्यामुळे भक्ती-शक्ती चौकातील उड्डाणपुलाच्या 90 कोटी 53 लाख रुपयांच्या कामाला त्वरित स्थगिती द्यावी. तसेच आयुक्त आणि स्थायी समितीच्या पदाधिकार्यांची चौकशी करावी, अशी मागणी भापकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.