महापालिका इमारतीची सुरक्षा वार्‍यावरच!

0

पिंपरी-चिंचवड : शहरातील विविध विकसकांना कायद्यानुसार व सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अग्निशमन यंत्रे बसवून, त्याचे वर्षाला नुतनीकरण करण्याचे बंधन घालणार्‍या महापालिकेची सुरक्षाच वार्‍यावर असल्याचे चित्र आहे. महापालिका इमारतीतील बहुसंख्य फायर इस्टिंग्युशर हे मुदतबाह्य असल्याने दुर्दैवाने महापालिकेत आगीची घटना घडली; तर त्यास जबाबदार कोण असेल, अशी खंत व्यक्त करत स्थायी समिती सदस्य प्रा. उत्तम केंदळे यांनी अग्निशमन दलाच्या अधिकार्‍यांचे चांगलेच कान टोचले आहेत. सर्व फायर इस्टिंग्युशर तातडीने रिफिलिंग करण्यात यावेत, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत. दरम्यान, महापालिकेच्या इमारतीतील मुदतबाह्य फायर इस्टिंग्युशरकडे दैनिक ‘जनशक्ति’ने सर्वप्रथम लक्ष वेधले होते. महापालिका प्रशासन व अग्निशमन दलाचा भोंगळ कारभार यानिमित्ताने चव्हाट्यावर आला आहे.

यंत्रांची मुदत सहा महिन्यांपूर्वीच संपली
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक मजल्यावर अग्निशमन यंत्रे बसविण्यात आलेली आहेत. कायद्यानुसार प्रत्येक वर्षाला या यंत्रांचे नुतनीकरण करून घेणे, त्याचे फायर आणि स्ट्रक्चरल ऑडिट करणे त्याच बरोबर फायर डिटेक्शन आणि फायर प्रिव्हेन्शन यंत्रणा राबविणे महत्त्वाचे असते. परंतु महापालिकेतील सर्व यंत्रांची मुदत गेल्या सहा महिन्यांपूर्वीच संपली आहे. तेव्हापासून यंत्रांचे रिफिलिंग करण्यात आलेले नाही. अशा परिस्थितीत जर महापालिकेत काही दुर्घटना घडली तर आग आटोक्यात येईल का? त्यात जर मनुष्यहानी किंवा महत्त्वपूर्ण साहित्याचे नुकसान झाले, तर यास जबाबदार कोण? असे प्रश्न प्रा. उत्तम केंदळे यांनी उपस्थित केले आहेत.

मंत्रालयातील घटनेची पुनरावृत्ती नको
21 जून 2014 रोजी मंत्रालयात शॉर्टसर्किटमुळे आग लागली होती. त्या अग्नितांडवात महत्त्वपूर्ण कागदपत्रांसह साहित्याचे नुकसान झाले होते. मंत्रालयातदेखील फायर डिटेक्शन यंत्रणा होती. परंतु फायर प्रिव्हेन्शन यंत्रणा व स्प्रिंकलर यंत्रणा कार्यान्वित नव्हती. म्हणून ती आग भडकली होती. या घटनेची पुनरावृत्ती महापालिकेत होऊ नये, यासाठी लवकरात लवकर महापालिकेच्या मुख्य इमारतीसह शहरातील सर्व प्रशासकीय कार्यालये, शाळांमध्ये अग्निशमन यंत्रांचे रिफिलिंग करण्यात यावे. त्यानंतर त्यांचे रितसर फायर आणि स्ट्रक्चरल ऑडिट करावे, अशी मागणी प्रा. उत्तम केंदळे यांनी केली आहे.

चालढकलपणा उघड
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक मजल्यावर बसविण्यात आलेली अग्निशमन यंत्रे मुदतबाह्य असून, सद्यस्थितीत ती केवळ शो-पीस म्हणून उरली आहेत. नियमानुसार तसेच सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अग्निशमन यंत्रांचे वेळेत रिफिलिंग तसेच फायर व स्ट्रक्चरल ऑडिट होणे गरजेचे आहे. परंतु महापालिका प्रशासनासह अग्निशमन दलातील अधिकार्‍यांच्या चालढकल वृत्तीमुळे ही कार्यवाही केली जात नाही. मात्र, ही बेफिकीरी भविष्यात खूप घातक ठरू शकते, याचे भान ठेऊन आता तरी लवकरात लवकर रिफिलिंगची कार्यवाही करावी, अशा सूचनादेखील प्रा. केंदळे यांनी केल्या आहेत.