महापालिका उभारणार अपंग केंद्र

0

पिंपरी : महापालिकेच्या वतीने अपंग केंद्र उभारण्यात येणार आहे. त्याव्दारे शहरातील अंध, अपंग, मतीमंद अशा विशेष व्यक्तींना एकाच ठिकाणी सर्व सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्याचा पालिकेचा विचार आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी प्राथमिक 3 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. पालिकेच्या नागरवस्ती विकास विभागाने नवी मुंबईतील अपंग एज्युकेशन व प्रशिक्षण केंद्राच्या धर्तीवर ही संकल्पना राबविण्याचा विचार केला. त्यानुसार सर्वसाधारण सभेने या विषयाला मंजुरी दिली आहे.

तीन कोटींची तरतूद
पिंपरीतील इंदिरा गांधी उड्डाणपुलाशेजारी महापालिकेचा आरक्षित भूखंड आहे. या भूखंडाचा सध्या खासगी लोकांकडून वाहनतळ म्हणून उपयोग केला जातो. मात्र, पालिकेने सुमारे 1800 चौरस मीटर भूखंडावर हे अपंग केंद्र साकरण्याचा निर्णय घेतला आहे. तेथे चार मजली इमारत बांधली जाणार आहे. त्यासाठी दोन वर्षात सुमारे आठ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. इमारत पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी अंध, अपंग, मतिमंद, गतिमंद अशा विशेष व्यक्तींसाठी सर्व सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार आहे. त्यांना लागणारे दाखले, वैद्यकीय तपासण्या, कार्यशाळा, प्रशिक्षणाच्या उद्देशाने हे केंद्र होणार आहे. त्यासाठी अंध, अपंगासाठी काम करणार्‍या सामाजिक संस्थाचीही मदत घेतली जाणार आहे.