महापालिका उभारणार सांडपाणी पुर्नवापर प्रकल्प

0
परी-चिंचवड, हिंजवडी, चाकण, तळेगाव दाभाडे एमआयडीसीमधील दुषित पाणी नदीत 
परिसरात सहा ठिकाणी हे जलकुंभ उभारण्यात येणार 
तळेगाव दाभाडे : शहरातील पवना आणि इंद्रायणी नदीमध्ये ठिकठिकाणी सांडपाणी प्रक्रीया न करता सोडले जात आहे. त्यामुळे नदीचे प्रदुषण वाढले आहे. दिवसेंदिवस हे प्रदुषण जास्तच वाढत चालले आहे. त्यामुळे नदी ही गटारगंगा झाली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यावर उपाय शोधून तो अंमलात आणण्याच्या प्रयत्नात होती. पिंपरी-चिंचवड, हिंजवडी, चाकण आणि तळेगाव दाभाडे परिसरात एमआयडीसी आहे. त्यामुळे या कारखान्यांमधील दुषित पाणी, सांडपाणी तसेच नदीत सोडले जाते. एमआयडीसीत रोज निर्माण होणार्‍या सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचे पुनर्चक्रिकरण व पुनर्वापर प्रकल्प उभारण्याचा आराखडा तयार केला आहे. त्यानुसार कासारवाडी व चिखलीत प्रकल्प प्रस्तावित असून सहा ठिकाणी जलकुंभ उभारण्यात येणार आहेत. त्यांच्या माध्यमातून रोज 312 दशलक्ष लीटर सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट आहे.
महापालिकेने मांडला प्रस्ताव
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने सांडपाण्याचा पुर्नवापर करण्यासाठी हा प्रस्ताव मांडला आहे. भविष्यात पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन शाश्‍वत जलस्रोतनिर्मिती, पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन व नियोजनपूर्ण वापर करण्यासंदर्भात राज्य सरकारने धोरण निश्‍चित केले आहे. त्यानुसार सांडपाण्यावर प्रक्रिया करणे, पुनर्चक्रिकरण व पुनर्वापरासाठी महापालिकेने आराखडा तयार केला असून, त्यासाठी आयआयटी किंवा नॅशनल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (निरी) यांनी विकसित केलेले तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. प्रक्रियायुक्त पाणी नवीन बांधकामे, सर्व्हिस सेंटर, लाँड्री दुकाने, कुलिंग टॉवर, हाउसिंग सोसायट्या, उद्याने, क्रीडांगणे, स्वच्छतागृहे आदी ठिकाणी वापरण्यात येणार आहे. हा सांडपाणी प्रकल्प पुनर्वापर प्रकल्प राज्य व केंद्र सरकारच्या मदतीने किंवा पीपीपी माध्यमातून उभारण्याच्या प्रस्तावास महापालिका विधी समितीने मंजुरी देऊन सर्वसाधारणकडे पाठविला आहे. प्रकल्प उभारण्यासाठी शहर परिसराची पिंपळे सौदागर, वाकड, हिंजवडी, चिंचवड एमआयडीसी, चिखली, निगडी, प्राधिकरण, तळेगाव एमआयडीसी आणि चाकण एमआयडीसी अशी चार भागांत विभागणी केली आहे.
2 वर्षांचा कालावधीत प्रकल्प
महानगरपालिकेने मांडलेल्या प्रस्तावामध्ये हा प्रकल्प उभारणीसाठी 2 वर्षांचा कालावधी लागणार आहे. देखभाल दुरुस्ती कालावधी 20 वर्षे असेल. कासारवाडीत प्रतिदिन 75 दशलक्ष लिटर क्षमतेचे प्रक्रिया केंद्र व पंपिंग स्टेशन उभारणे, कासारवाडीतून पिंपळे सौदागर, वाकड, हिंजवडी एमआयडीसीसाठी पाणीपुरवठा करणे, चिखलीत प्रतिदिन पाच दशलक्ष क्षमतेचे केंद्र उभारणे, प्रक्रियायुक्त पाणी वितरणासाठी पहिल्या टप्प्यात 607 किलोमीटर लांब जलवाहिन्या टाकण आदी कामे या अंतर्गत केली जाणार आहे. त्यावर एकूण 400 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.