महापालिका करणार आरक्षणांचा विकास

0

पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात शहर विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी तरतूद केलेल्या 205 कोटी रुपयांतील 112 कोटींचा निधी 35 आरक्षणे आणि 41 प्रमुख पर्यायी रस्ते, उड्डाणपूल कामांच्या वर्गीकरणास स्थायी समिती सभेत बुधवारी मंजुरी देण्यात आली. महापालिकेत 1997 मध्ये समाविष्ट झालेल्या भागातील आरक्षणे आणि रस्ते विकसित करण्यात आले नव्हते. त्यामुळे शहरात अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. परंतु, सत्ताधारी भाजपने मिशन शहर विकास आराखडा हाती घेतला आहे.

35 आरक्षणे व 41 रस्ते-उड्डाणपुलांचे काम होणार
प्रत्येक वर्षी विकास आराखड्याच्या पाच टक्के अंमलबजावणीसाठी महापालिका अर्थसंकल्पात प्रथमच शहर विकास आराखडा हे लेखाशीर्ष तयार केले आहे. त्या लेखाशीर्षाखाली 205 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. या तरतुदीतून विकास आराखड्यातील आरक्षणे व प्रमुख रस्त्यांचा विकास करण्याचे नियोजन केले होते. त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सत्ताधार्‍यांनी पाऊल उचलले आहे. शहर विकास आराखड्यासाठी तरतूद केलेल्या 205 कोटी रुपयांपैकी 112 कोटी रुपये 35 आरक्षणे, 41 महत्त्वाचे पर्यायी रस्ते व डेअरी फॉर्मचा उड्डाणपूल, कृष्णानगरमधील स्पाईन रस्त्यावर शरदनगर ते शिवाजी पार्कला जोडणारा उड्डाणपूल बांधण्यासाठी वर्गीकरण करण्यास स्थायी सभेने मंजुरी दिली आहे.

आरक्षणात ही कामे होतील
विकसित करण्यात येणार्‍या संभाव्य 35 आरक्षणांमध्ये महिलांसाठी समुपदेशन केंद्र, कायदे विषयक कायदा सल्ला केंद्र, उद्यान, खेळाचे मैदान, स्मशानभूमी, सांस्कृतिक केंद्र, बहुमजली वाहनतळ, नाईट शेल्टर, शाळा इमारतींचा समावेश आहे. तसेच मोरवाडीतील सिटी सेंटरच्या आरक्षित जागेसह आरक्षणाच्या जागांवर अतिक्रमण होऊच नये, याकरिता त्या जागांना सीमाभिंत बांधण्यात येणार आहे.