महापालिका करणार 900 कंत्राटी सुरक्षारक्षकांची भरती

0

स्थायी समितीची विषयाला मंजुरी

पिंपरी-चिंचवड : महापालिकेची विविध क्षेत्रीय कार्यालये आणि महत्त्वाच्या ठिकाणी 900 खासगी सुरक्षारक्षक कंत्राटी तत्त्वावर नेमण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी 15 कोटींचा खर्च अपेक्षित असून, त्या संदर्भातील निविदेचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला होता. त्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. महापालिकेची क्षेत्रीय कार्यालये, उद्याने, स्मशानभूमी, रुग्णालये, जलकेंद्र, पाण्याच्या टाक्या आदी मालमत्तेचे संरक्षण करण्याची जबाबदारी महापालिकेच्या सुरक्षा विभागाकडे आहे. मात्र, महापालिकेकडे केवळ 430 सुरक्षारक्षक असून, 236 पदे अद्याप रिक्त आहेत. त्यातच यंदाच्या अंदाजपत्रकात या विभागासाठी अत्यल्प तरतूद असल्याने सुरक्षारक्षकांची कपात करण्याची वेळ महापालिकेवर आली होती. परिणामी, महापालिकेच्या मालमत्तेच्या सुरक्षेचा विषय गंभीर झाला होता.

13 पैकी 10 निविदा पात्र
मालमत्तांच्या रक्षणासाठी 900 खासगी सुरक्षारक्षकांची कंत्राटी तत्त्वावर नेमणूक करण्यासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया राबविली होती. त्यामध्ये आलेेल्या एकूण 13 निविदांपैकी 10 पात्र ठरल्या होत्या. त्यापैकी सैनिक इंटेलिजन्स अ‍ॅण्ड सिक्युरिटी प्रा. लि. या कंपनीची 14 कोटी 99 लाख 5 हजार 80 रुपयांची निविदा सर्वांत कमी दराची ठरली आहे. त्याद्वारे 900 कंत्राटी सुरक्षारक्षकांची एका वर्षांसाठी नियुक्ती केली जाईल. त्यांना दरमहा 13 हजार 880 रुपये वेतन दिले जाणार असून, कंपनीसोबत करार करण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला होता. त्याला मान्यता मिळाली आहे.