महापालिका करवसुली पथकातील कर्मचारी कार्यालयातच बसून

0

धुळे । महापालिकेने मालमत्ताधारकांना शास्तीमाफी देण्यासाठी अभय योजना जाहीर केली आहे. आयुक्तांच्या आदेशानुसार कर वसुली करण्यासाठी तब्बल 39 पथके नेमण्यात आली. मात्र त्यापैकी बहूतांश पथकाचे सदस्य मनपातच बसून असल्याचे दिसून येते. त्यामुळे बरीच पथके कागदावरच कार्यरत आहेत. यामुळे धडक कारवाईसाठी पथके नेमून देखील कोणतीही मोठी कारवाई आतापर्यंत झालेली दिसून येत नाही.

मनपात रांगा
अभय योजना जाहीर झाल्यापासून पहिल्या सात दिवसांत तब्बल 1 कोटी रूपयांची करवसुली झाली असून त्यात 7 लाखांच्या शास्तीचा समावेश आहे. महापालिकेने शास्तीमाफी अभय योजनेंतर्गत मालमत्ताधारकांना 5 ते 23 फेब्रुवारी शास्तीत 50 टक्के तर 26 फेब्रुवारी ते 9 मार्च 25 टक्के सवलत जाहीर केली आहे़ शास्तीमाफी योजनेमुळे मनपात कर भरण्यासाठी मालमत्ताधारकांच्या रांगा लागत आहे.

पहिला आठवडा लाभदायी
शास्तीमाफी योजना लागू झाल्यापासून अर्थात 5 ते 14 फेब्रुवारी या कालावधीत मनपाने एकूण 1 कोटी 5 लाख 95 हजार 108 रूपयांची करवसुली केली आहे़ त्यात 23 लाख 50 हजार 105 रूपये मागील थकबाकी वसुल झाली असून 38 लाख 77 हजार 945 रूपये चालू कर वसुल झाला आहे़ रोखीचा भरणा एकूण 62 लाख 28 हजार 50 रूपये असून धनादेशाव्दारे 43 लाख 67 हजार 58 रूपये कराचा भरणा झाला आहे़ सर्व मिळून एकूण 1 कोटी 5 लाख 95 हजार 108 रूपयांचा मालमत्ता कर वसुल झाला आहे़ त्यामुळे शास्तीमाफीनंतर पहिलाच आठवडा मनपाला लाभदायी ठरला आहे.

मालमत्ता लिलावासाठी घेणार स्थायीची मान्यता
महापालिकेने मागील व चालू वर्षी सील केलेल्या मालमत्तांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे़ मात्र तत्पूर्वी मालमत्ताधारकांना नियमानुसार नोटीस देऊन मालमत्ता सील केल्यापासून 21 दिवसांची मुदत कर भरण्यासाठी दिली जाणार आहे़ तोपर्यंत मनपाकडून मालमत्तांचे मुल्यांकन करून त्यास स्थायी समितीच्या सभेत मान्यता घेतली जाणार आहे. ज्या मालमत्तांना जाहीर लिलाव प्रक्रियेत प्रतिसाद मिळणार नाही, त्या नाममात्र शुल्क आकारून मनपाच्या नावाने केल्या जातील.