महापालिका कर्मचार्‍यांच्या आकृतीबंधाला गती?

0

पिंपरी-चिंचवड : शासन सेवेतील अधिकार्‍यांना महापालिका सेवेत समाविष्ठ करून आपल्या कर्मचार्‍यांना पदोन्नती देताना अडचण निर्माण होणार नाही, याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर महापालिकेचा ‘ब’ वर्गात समावेश झालेला असून, आकृतीबंध शासनस्तरावर अद्याप रखडलेला आहे. त्या आकृतीबंधाला मंजुरी घेण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी केली. महापालिकेची सर्वसाधारण सभा शनिवारी महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सभेत महापालिका कर्मचार्‍यांच्या आकृतीबंधाच्या विषयावर चर्चा झाली.

दोन अधिकार्‍यांना नियुक्ती
पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवर प्रशासन अधिकारी अभिनामाची पदे शासन मंजूर आहेत. या पदावर संदीप खोत व सीताराम बहुरे यांना सरळसेवा प्रवेशाने प्रशासन अधिकारी या पदावर नियुक्ती देण्यात आलेली आहे. त्या दोन्ही अधिकार्‍यांना महापालिका सेवेत सामावून त्यांना विविध सेवा-सुविधांचा लाभ देण्यास सभेने मान्यता दिली.

नगरसेवक वाघेरेंचा आक्षेप
याप्रसंगी नगरसेवक संदीप वाघेरे म्हणाले की, शासन सेवेतील प्रशासन अधिकार्‍यांना महापालिका सेवेत कायम करणार का? त्यांना कोणत्या नियमाने सामावून घेत आहात? त्यांना सामावून घेताना महापालिकेतील अन्य कर्मचार्‍यांवर अन्याय तर होत नाही का? यावर संबंधित प्रशासन विभागाच्या अधिकार्‍यांनी खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.