पिंपरी ः राष्ट्रीय मतदारदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शुक्रवारी सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ घेतली. राज्य निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार आज पिंपरी-चिंचवड महापालिकेत मतदार दिन साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित कर्मचार्यांना निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी शपथ दिली. राष्ट्रीय मतदार दिवस 25 जानेवारी रोजी साजरा केला जातो. मात्र, या दिवशी दुसरा शनिवार असल्याने कार्यालयास शासकीय सुट्टी असते. त्यामुळे शासन निर्देशानुसार शुक्रवारी (दि. 24) राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. त्याअनुषंगाने 18 वर्षे पूर्ण केलेल्या नवीन तरूण मतदारांचा यादीत समावेश करणे व त्यांचा मतदान प्रकियेत सहभाग वाढविणे हा प्रमुख उद्देश आहे. या राष्ट्रीय मतदार दिवसाच्या अनुषंगाने सर्व शाळा व शैक्षणिक संस्थामध्ये वादविवाद स्पर्धा, प्रारूप मतदान, चित्रकला स्पर्धा, क्वीझ कॉम्पीटिशन इ. स्पर्धा आयोजित करून लोकशाही व मतदाराचा सहभाग यांचे महत्त्व पटवून देण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.