पिंपरी-चिंचवड : कोणत्याही सरकारी कार्यालयात गेल्यावर पहिल्याच फेरीत अनेकदा काम होत नाही. त्यासाठी वारंवार फेर्या माराव्या लागतात. त्यामुळे नागरिकांना मन:स्ताप सहन करावा लागतो आणि वेळही वाया जातो. नागरिकांच्या वेळेचे महत्व लक्षात घेऊन महापालिकेने शहरातील नागरिकांना त्यांच्या महापालिकेतील कामासंदर्भातील माहिती ’एसएमएस’द्वारे मोबाईलवर देण्याचा निर्णय घेतला आहे. ही ऑनलाईन सोय उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेमार्फत ठेकेदाराला 16 लाख 20 हजार रूपये देण्यात येणार आहेत.
वेळेचा अपव्यय टळणार
महापालिकेच्या विविध विभागाकडील 40 ते 45 प्रकारच्या सेवा ऑनलाईन पद्धतीने करण्यात आल्या आहेत. यामध्ये नागरवस्ती विकास योजना, नगररचना विभाग, महापालिका क्रीडांगण बुकींग, मालमत्ताकर विभाग, एलबीटी विभाग, महापालिका रूग्णालये, बांधकाम परवानगी आदी विभागातील अनेक सेवा पुरविल्या जातात. अशा कामांसाठी नागरिक अर्ज करतात. आपले काम पूर्ण होत आले आहे की, नाही याची माहिती घेण्यासाठी नागरिकांना प्रत्येकवेळी महापालिका कार्यालयात यावे लागते. यामध्ये त्यांचा नाहक वेळेचा अपव्यय होतो. आता मात्र, वेळेचा अपव्यय टळणार आहे.
16 लाख 20 हजारांची निविदा मंजूर
महापालिकेने अशा कामांसाठी नागरिकांना महापालिका कार्यालयात न येता या कामासंबंधीची माहिती त्यांना एसएमएसद्वारे पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, नागरिकांना त्यांच्या कामाची इत्यंभुत माहिती देण्यासाठी महापालिकेच्या माहिती-तंत्रज्ञान विभागामार्फत एक कोटी एसएमएस पॅक खरेदीसाठी ऑनलाईन निविदा दरपत्रक मागविण्यात आले. त्यामध्ये तीन निविदा धारकांनी दरपत्रक सादर केले. त्यापैकी चिंचवड येथील टेक 9 सर्व्हिसेस यांनी 16 लाख 20 हजार हा लघुत्तम दर सादर केला. महापालिका मुख्य लेखापरीक्षक पद्मश्री तळदेकर आणि अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे यांनी हे दर स्वीकृत केले आहेत.