पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी – महापालिका कासारवाडी येथील सर्व्हे नंबर 420 येथील छत्रपती शाहू महाराज विद्यालयाच्या आवारात पाच मजली प्रशस्त शाळा बांधणार आहे. या इमारतीसाठी 13 कोटी 71 लाख 32 हजार 197 रुपये खर्च अपेक्षित आहे. या खर्चाला स्थायी समितीने मान्यता देखील दिली आहे. शाळा बांधण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती. यासाठी स्थानिक नगरसेवकांनी पाठपुरावा केला होता. बांधकामाचा ठेका एस.एस. साठे या ठेकेदाराला देण्यात आले आहे.
दोन वर्षात होणार शाळा
बांधकाम पुर्ण करण्यासाठी ठेकेदाराला दोन वर्षाची मुदत दिली आहे. एकूण भूखंडाचे क्षेत्र 8911.30 चौरस मीटर आहे. सद्यस्थितीत शाळेचे क्षेत्र 3789.21 चौरस मीटर आहे. 2861.81 चौरस मीटरमध्ये शाळा इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे. शाळा पाच मजली असणार आहे. पार्किंग क्षेत्र 1092.29 चौरस मीटर, पहिल्या मजल्यावरील बांधकाम क्षेत्र 583.31 चौरस मीटर, दुसर्या मजल्यावरील 581.50 चौरस मीटर, तिसर्या मजल्यावरील 580.79 चौरस मीटर, चौथ्या मजल्यावरील 580.20 चौरस मीटर आणि पाचव्या मजल्यावरील बांधकाम क्षेत्र 533.01 चौरस मीटर आहे.
या असतील सुविधा
तळमजला पार्किंग, बालवाडीसह एकूण 41 वर्ग असणार आहेत. प्रशासन, प्राचार्य कार्यालय, ग्रंथालय, प्रयोग शाळा, संगणक रुम, मल्टीपर्पज हॉल, मुला-मुलींसाठी प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र शौचालय असणार आहे. अपंगांसाठी रॅम्प, लिफ्ट व स्वतंत्र शौचालय, 1550 चौरस मीटर खेळाचे मैदान आणि संपुर्ण शाळेसाठी सीमाभिंत व कमान बांधण्यात येणार आहे.