कल्याण । कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत शहरातील मुख्य रस्त्यांची साफसफाई करण्यात येऊन जंतुनाशक औषध तसेच पावडरची फवारणी करण्यात आली. यावेळी आयुक्तांनी स्वतः विविध ठिकाणी पाहणी करत संबंधित अधिकार्यांना स्वच्छतेबाबत पाऊले उचलण्याचे आदेश दिले. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत संपूर्ण देशभरात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनाच्या पार्श्वभूमीवर 2 ऑक्टोबर 2017 पर्यंत स्वच्छता हीच सेवा या संकल्पने अंतर्गत स्वच्छता मोहीम राबविली जात आहे.
मोहीमेचा एक भाग म्हणून गेल्या रविवारप्रमाणे संपूर्ण महापालिका क्षेत्रात 10 प्रभाग कार्यालय अंतर्गत सकाळी स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या मोहिमे अंतर्गत शहरातील मुख्य रस्त्यांची साफसफाई करण्यात येऊन जंतुनाशक औषध तसेच पावडरची फवारणी करण्यात आली. या स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ एकाच वेळी विविध ठिकाणी करण्यात आला. आयुक्त पी. वेलरासू यांनी कल्याण पूर्वेतील अशोक नगर, शिवाजी नगर, आनंद वाडी, पिसवली, त्रिमूर्ती नगर घरडा सर्कल येथे स्वतः जाऊन सार्वजनिक शौचालयांची पाहणी केली. शौचालयाची दुरवस्था पाहून आयुक्तांनी जल अभियंता, कार्यकारी अभियंत्यांना दुरुस्त करण्याच्या सूचना देऊन, घन कचरा व्यवस्थापन विभागास स्वच्छता राखण्याचे आदेश दिले.
लोकसहभाग महत्त्वाचा
ही मोहीम पालिका स्तरावरील जरी असली तरीही या मोहीमेत नागरिक, सेवाभावी संस्था, यांनी सहभागी होण्याचे आवाहन पालिका आयुक्त पी. वेलरासु यांनी केले आहे. महापालिका आपले काम करीत आहे, मात्र लोकसहभाग असल्याशिवाय ही मोहीम 100 टक्के यशस्वी होणार नाही असे आयुक्तांनी स्पष्ट केले. त्यामुळे लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे पालिका आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले.