पुणे । शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी सिंगापूर येथील सिंगापूर कॉपरेशन एन्टरप्रायजेस आणि टेमासेक फाउंडेशन इंटरनॅशनलच्या वतीने महापालिका अधिकारी तसेच संबधित विभागाच्या अभियंत्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी सुमारे 2 कोटी 70 लाख रुपयांचा खर्च येणार आहे. त्यातील 1 कोटी 77 लाख रुपये या दोन संस्था अनुदान स्वरुपात देणार असून उर्वरील 92 लाखांचा खर्च महामेट्रो करणार आहे.
या प्रशिक्षणासाठी या दोन्ही संस्थांबरोबर सामंजस्य करार करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या वाहतूक नियोजन विभागाकडून स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत संपूर्ण वर्षभरात सुमारे 5 कार्यशाळा होणार असून त्यातील 3 कार्यशाळा पुण्यात तर 2 कार्यशाळा सिंगापूर येथे होणार आहेत. त्यात सिंगापूर येथे मेट्रो प्रकल्पाची कामकाज पध्दती तसेच मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्टेशन या विषयावर कार्यशाळा होणार आहेत. तर पुण्यात मल्टी मॉडेल ट्रान्स्पोर्टेशन अॅन्ड इंटीग्रेशन, मेट्रो ऑपरेशन या विषयांवरील कार्यशाळा होणार आहेत. प्रशासनाच्या प्रस्तावानुसार, या संपूर्ण प्रशिक्षणात सुमारे 160 जणांना प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यातील 35 जणांना सिंगापूर येथील कार्यशाळेत सहभागी करून घेतले जाणार आहे. त्यात महापालिक आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहमहापालिका आयुक्त, तांत्रिक विभागाचे अधिकारी, कार्यकारी अभियंता यांचा समावेश असणार आहे.