कोट्यवधी रुपयांचे प्रस्ताव स्थायी समोर
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका थेरगाव येथील सर्वे नंबर 9 येथे बहुउद्देशीय इमारत बांधणार आहे. त्यासाठी 11 कोटी 80 लाख रुपयांचा खर्च येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव मान्यतेसाठी स्थायी समितीसमोर ठेवला आहे. त्याचबरोबर कोट्यवधी रुपयांचे प्रस्ताव स्थायी समोर ठेवण्यात आले आहेत.
रुग्णालयाची इमारत पाडून नवीन!
थेरगावातील सर्वे नंबर नऊ येथे बहुउद्देशीय इमारत बांधली जाणार आहे. त्यासाठी 11 कोटी 80 लाख रुपये खर्च येणार असून हे काम एस. एस. साठे यांना देण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव मान्यतेसाठी स्थायी समितीसमोर ठेवला आहे. महापालिकेच्या जुन्या तालेरा रुग्णालयाची इमारत मोडकळीस आली आहे. त्यामुळे ही इमारत पाडण्यात येणार आहे. त्याठिकाणी नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. त्यासाठी 39 कोटी 13 लाख 70 हजार रुपयांचा खर्च होणार आहे.
वाकडमध्ये रस्ते विकसित करणार!
चापेकर चौक ते केवशनगर काळेवाडी परिसरातील रस्त्यांच्या क्राँक्रीटकरणाचा दुसरा टप्पा विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी 11 कोटी 7 लाख 16 हजार रुपयांचा खर्च येणार आहे. जाधववाडी, कुदळवाडी येथील ताब्यात असलेल्या आरक्षणांचा विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी एक कोटी 47 लाख रुपये खर्च येणार आहे. वाकडमध्ये नव्याने ताब्यात येणार्या जागेनुसार विकास आराखड्यातील रस्ते विकसित करण्यात येणार आहेत. त्यासाठी एक कोटी 26 लाखांचा खर्च येणार आहे. महापालिकेच्या बालवाड्यांमध्ये मुला/ मुलींच्या बौद्धिक विकासाकरिता खेळणी बसविण्यात येणार आहे. त्यासाठी 98 लाख 90 हजार रुपयांचा खर्च येणार आहे. हे प्रस्ताव मान्यतेसाठी स्थायी समितीसमोर ठेवले आहेत.