महापालिका नगररचना उपसंचालकांना एक वर्ष मुदतवाढ

0

बदलीसंदर्भात आदेश नसल्याने संभ्रम

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका नगररचना विभागाचे उपसंचालक प्रकाश ठाकूर यांना एक वर्षे मुदतवाढ देण्यात आली आहे. नगरविकास विभागाचे सहसचिव विष्णू पाटील यांनी हा आदेश दिला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नगररचना उपसंचालक प्रकाश ठाकूर यांची 14 फेब्रुवारी 2018 रोजी बृहन्मुंबईच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या उपसंचालकपदी बदली झाली होती. त्यांच्या जागी झोपडपट्टी निमुर्लन व पुनर्वसन (एसआरए)विभागाचे उपसंचालक अ.ग.गिरकर यांची वर्णी लागली होती. मात्र, ठाकूर यांनी पिंपरी पालिकेतील पदभार सोडला नव्हता. तसेच आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी देखील त्यांना कार्यमुक्त केले नव्हते. मात्र, त्यानंतरही शासनाने त्यांच्या बदलीसंदर्भात कोणताही आदेश न काढल्याने त्यांच्या नियुक्तीबाबत संभ्रम निर्माण झाला होता.

उपसंचालकपदाच्या नियुक्तीमध्ये मुदतवाढ
नगरविकास विभागाने या अधिकार्‍यांच्या प्रतिनियुक्तीमध्ये अंशत: बदल केला आहे. त्यानुसार प्रकाश ठाकूर यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगररचना विभागाच्या उपसंचालकपदाच्या नियुक्तीमध्ये एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदत 6 जून 2019 पर्यंत वाढवून देण्यात आली आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य लेखापरीक्षक पद्मश्री तळदेकर यांची 16 मे रोजी पुण्यात प्राथमिक शिक्षण संचालनालयात नव्याने स्थापन केलेल्या शालेय पोषण आहार विभागात उपसंचालकपदी (वित्त व लेखा) त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र,पंधरा दिवस उलटल्यानंतरदेखील त्यांच्या बदलीनंतर त्यांच्या जागी कोणत्याही अधिकार्‍याची नियुक्ती करण्यात आली नव्हती. त्यामुळे त्यांच्याकडेच महापालिकेच्या मुख्यलेखापरीक्षक पदाचा कार्यभार होता.

कुंभोजकर मुख्य लेखा परीक्षक
त्यानंतर वित्त विभागाने काढलेल्या बदली आदेशानुसार, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य लेखापरीक्षकपदी नागपूर कोषागार कार्यालयातील वरिष्ठ कोषागार अधिकारी आमोद आप्पाजी कुंभोजकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, पाच दिवसांच्या कालावधीनंतर कुंभोजकर यांनी महापालिकेतील मुख्य लेखा परीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. याशिवाय ज्योत्स्ना शिंदे यांना महापालिका शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारीपदी रुजू करुन घेण्यात आले आहे.