महापालिका निवडणुकांचे निकाल; लातुर, चंद्रपूरात कमळ फुललं

0

मुंबई : लोकसभा, विधानसभा निवडणुकांत मागील दोन-अडीच वर्षांत राज्यात झालेल्या सर्व प्रकारच्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये भाजपची विजयाची घौडदौड सुरू आहे. आज लातूर, चंद्रपूर आणि परभणी या तीन महापालिकांच्या निवडणुकांच निकाल घोषित झाला, त्यातही भाजपनेच मुसंडी मारत चंद्रपूरसह लातूर महापालिकेतही कमळ फुलवले, मात्र परभणी महापालिकेत काँगे्रसने बाजी मारली.

या तीनही महापालिकांच्या निवडणुकांमध्ये जसे 1285 उमेदवारांचे राजकीय भवितव्य पणाला लागले होते, तसेच अर्थमंत्री सुधीर मुनंगटीवार, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज आहिर, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र आमदार अमित देशमुख, भाजप नेते संभाजी निलंगेकर-पाटील या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठाही पणाला लागली होती.

लातुरात जलदूतने भाजपला जिंकवले
आजच्या निकालानंतर ज्या लातूर महापालिकेत मागील पाच वर्षे भाजपचा एकही नगरसेवक नव्हता, त्या महापालिकेतच भाजपने स्पष्ट बहुमताने एकहाती सत्ता आणून आपली ताकद दाखवून दिली. एकूण 70 सदस्य संख्या असलेल्या या महापालिकेत भाजपने 41 जागा जिंकून स्व. माजी मुख्यमंत्री विलास देशमुख यांचे नावलौकीकाचे वर्चस्व असलेल्या या भागातून भाजपने काँग्रेसची सत्ता उलथवून टाकली, या ठिकाणी काँग्रेसला अवघ्या 28 जागा जिंकता आल्या, तर राष्ट्रवादीला अवघी एक जागा जिंकता आली आहे.

गेल्या वर्षीच्या दुष्काळात केंद्र सरकारने जलदूत या ट्रेनने लातूरकरांना पाणीपुरवठा केला होता. त्यामुळे नागरिकांनी भाजपला भरभरून मतदान केल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. त्याशिवाय, संभाजीराव पाटील-निलंगेकरांच्या नियोजनबद्ध प्रचारनीतीचेही हे यश मानले जात आहे. याउलट, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव अमित देशमुख यांनी व्यक्तीकेंद्री प्रचार केल्याचा फटका काँग्रेसला बसला आहे.

चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार यांनी गड राखला
चंद्रपूर महापालिका भाजपने जिंकून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांचा हा ा गड कायम राखत काँग्रेसला धोबीपछाड केले. चंद्रपूर महापालिकेतील एकूण 66 जागामध्ये भाजपने 36 जागावांवर विजय मिळवून स्पष्ट बहुमत मिळवले आहे. तर काँग्रेसला केवळ 12 जागा जिंकता आल्या. राष्ट्रवादी आणि शिवसेनेला मात्र केवळ 2 जागा जिंकता आल्या. अर्थमंत्री मुनगंटीवार यांचे होमग्राऊंड असल्यामुळे त्यांची प्रतिष्ठापणाला लागली होती. मुनगंटीवार यांच्यासह सर्वच भाजपच्या नेते आणि मंत्र्यांनी चंद्रपुरात प्रचाराचा धुराळा उडवला होता. भाजपच्या या आक्रमक प्रचारामुळे अखेर चंद्रपूरकरांनी भाजपच्या हातात सत्तेच्या चाव्या देऊ केल्या आहेत.

परभणीत काँग्रेस मोठा पक्ष, सत्तेसाठी मात्र आघाडी लक्ष्य
परभणी महापालिका निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अक्षरश: पाणीपत केले. या महापालिकेत एकूण 65 सदस्य संख्या आहेत. यात काँग्रेस सर्वाधिक 29 जागा जिंकून इथे सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने 20 जागा जिंकल्या. नुकत्याच झालेल्या 10 महापालिकांमध्ये राष्ट्रवादीला पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका गमवावी लागली होती, त्यामुळे परभणीत राष्ट्रवादीची प्रतिष्ठापणाला लागली होती. इथे केवळ सेनेचे आव्हान होते, त्यामुळे राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असे लढतीचे चित्र होते, पण, यात काँग्रेसने बाजी मारली. तर शिवसेनेला भाजपपेक्षा कमी 6 जागा जिंकता आल्या, भाजपने 8 जागा जिंकल्या आहे.