महापालिका निवडणूकीत इच्छुकांच्या शंका निरासनासाठी बैठक

0

जळगाव । महापालिका निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या इच्छुकांना निवडणूक खर्चाची माहिती द्यावी लागेल. त्याचसोबत बँकेत नवीन स्वतंत्र खाते उघडून त्यात निश्‍चित केलेली अथवा त्यापेक्षा कमी रक्कम भरावी लागेल. प्रचार व इतर कामांसाठी केलेल्या खर्चाची दैनंदिन माहिती निवडणूक आयोगाला द्यावी लागणार आहे, अशी माहिती आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी बैठकीत दिली. या बैठकीस पक्षांतील प्रमुख पदाधिकारी उपस्थित नव्हते. महापालिका निवडणुकीसह आचारसंहितेबाबत तसेच इच्छुकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी आज महापालिकेच्या सभागृहात राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांची बैठक झाली. यावेळी आयुक्त डांगे यांनी निवडणुकीसंदर्भात इच्छुकांच्या अडचणी जाणून घेत निवडणूक प्रक्रिया व आचारसंहितेबाबत माहिती दिली. यावेळी उपायुक्त चंद्रकांत खोसे, लक्ष्मीकांत कहार, पोलिस निरीक्षक एकनाथ पाडळे, आस्थापना अधीक्षक सुभाष मराठे उपस्थित होते.

वाद टाळण्यासाठी परवानगी आवश्यक
प्रचारासाठी जाहीर सभा व मिरवणुका विविध राजकीय पक्षांकडून काढल्या जातात. यावेळी वाद किंवा गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असल्याने उमेदवारांना निवडणूक आयोग व पोलिस प्रशासनाची परवानगी घ्यावी लागेल. मिरवणूक काढतांना वाहतुकीला अडथळा होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच एकाच वेळी व एकाच ठिकाणी राजकीय पक्षांना सभा व मिरवणूक काढता येणार नाही. दुसर्‍या पक्षातील नेत्यांचा, राष्ट्रीय पुरुषांच्या प्रतिमेचा अवमान झाल्यास कारवाई करण्यात येईल. निवडणूक संपल्यानंतर सर्व उमेदवारांना 20 दिवसांच्या आत निवडणूक खर्चाचा अहवाल द्यावा लागणार आहे, अशी माहिती आयुक्तांनी दिली.

अधिकारांचा गैरवापर होता कामा नये – रमेश जैन
आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून दिलेल्या अधिकारांचा अधिकार्‍यांकडून गैरवापर होत आहे. असे होता कामा नये. अधिकारी बर्‍याच वेळा राजकीय पक्षांच्या पदाधिकारी किंवा नेत्यांचा अवमान करतात. यामुळे वाद होतो, असे माजी महापौर रमेश जैन बैठकीत म्हणाले. यावर अधिकारीवर्ग लोकप्रतिनिधींशी सौजन्यानेच वागतील, असे आश्‍वासन आयुक्तांनी दिले.