पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विकास कामांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे महापालिकेत आले होते. यावेळी दुपारी ते महापालिकेच्या कॅंटीनमध्ये जेवणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आयुक्तांच्या कार्यालयात जाहीर जेवणाचा कार्यक्रम घेतला. आयुक्तांनी दिलेल्या जेवणावळीवर जोरदार टीका सुरू आहे. याच्या निषेधार्त राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने महापालिकेच्या मुख्य प्रवेशाद्वारासमोर भारतीय बैठक मारुन “खानावळ’ आंदोलन केले. या आंदोलनात विरोधी पक्षनेते नाना काटे, ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, राजू मिसाळ, मयूर कलाटे, मोरेश्वर भोंडवे, विक्रांत लांडे, वैशाली काळभोर, सुलोचना शिलवंत-धर यांच्यासह राष्ट्रवादीचे नगरसेवक सहभागी झाले होते.
या जेवणावळीच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी या आंदोलनात सहभाग घेत आम्हालाही आयुक्तांच्या कार्यालयात जेवण करावयाचे आहे, असा आग्रह धरत सोबत “व्हेज बिर्याणी’ आणली. भाजपाचे पदाधिकारी आयुक्तांसोबत जेवण करतात तर आम्ही का नाही? असा प्रश्न उपस्थित करत महापालिकेमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलनाची पूर्वकल्पना असल्याने या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. राष्ट्रवादीच्या आंदोलकांना महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले. यामुळे संतापलेल्या नगरसेवकांनी पालिकेच्या प्रवेशद्वारासमोरच आंदोलन करत या ठिकाणी जेवणाचा आस्वाद घेत आयुक्तांचा निषेध नोंदविला
आयुक्त श्रावण हर्डीकर हे पालकमंत्री व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांसह जेवण करू शकतात, तर आमच्यासोबत का नाही. त्यांना इडीच्या कारवाईचे भय दाखविले की काय? असा प्रश्न दत्ता साने यांनी उपस्थित केला.