विधी समितीने महिनाभर प्रस्ताव रोखले
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाचा उरफाटा कारभार समोर आला आहे. रितसर विषय पत्रिकेवरील डॉक्टरांच्या बढत्या आणि नगरसेवकांनी उपसूचनेद्वारे दिलेल्या उपअभियंत्यांच्या बढत्या यांना महासभेत मंजुरी देण्यात आली. मात्र, प्रशासनाने उपसूचनेद्वारे बढत्या दिलेल्या उपअभियंत्यांचे आदेश काढले. तर, डॉक्टरांच्या बढत्यांचे आदेश महिना उलटून गेला तरी देखील काढले गेले नाहीत. यावरुन प्रशासनावर टीकेची झोड उठत आहे. आदेश न काढून प्रशासन अधिकारी डॉक्टरांना ‘भेटायला’ येण्याचा संदेश तर यातून देत नाहीत ना, अशी चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.
आयुक्तांचा प्रस्ताव विधीसमोर
महापालिकेतील अधिकार्यांना अनुभवानुसार बढत्या दिल्या जातात. पदोन्नती समितीच्या बैठकीत बढत्या देण्याचे आयुक्त निश्चित करतात. त्यानंतर याबाबतचे प्रस्ताव विधी समितीमार्फत महासभेसमोर अंतिम मान्यतेसाठी ठेवले जातात. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी 28 जुलै 2017 रोजी पदोन्नती सभा घेतली. त्यात डॉक्टरांना बढत्या देण्याचे ठरविले. वैद्यकीय उपअधीक्षकपदी डॉ. शंकर जाधव यांना तर ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारीपदी डॉ. शैलजा भावसार, डॉ. प्रकाश ताडे, डॉ. सुनीता साळवे, डॉ. सुनीता इंजिनिअर, डॉ. संगीता तिरुमणी आणि डॉ. मेघा खरात यांना बढती देण्याचा निर्णय घेतला. तर, डॉ. राजेंद्र फिरके, डॉ. लक्ष्मण गोफणे यांना तात्पुरत्या स्वरुपात ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारीपदी बढती देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यानंतर हा प्रस्ताव मान्यतेसाठी विधी समितीसमोर ठेवला होता.
विधीला हवा निधी
विधी समितीने कोणतेही सबळ कारण न देता महिनाभर हे प्रस्ताव रोखले होते. विधीला ‘निधी’ हवा असल्यामुळेच प्रस्ताव रोखल्याचे आरोप झाले. त्यानंतर विधी समितीने डॉक्टरांच्या बढत्यांचा प्रस्ताव मंजूर करुन महासभेकडे अंतिम मान्यतेसाठी पाठविला. याबाबतचा प्रस्ताव डिसेंबर 2017 च्या सर्वसाधारण सभेसमोर मान्यतेसाठी आला. परंतु, सत्ताधार्यांनी ही सभा अगोदर 20 जानेवारीपर्यंत आणि त्यानंतर पाच फेब्रुवारीपर्यंत अशी दोनदा तहकूब केली होती.
तात्पुरत्या स्वरुपात बढती
पाच फेब्रुवारीला झालेल्या सर्वसाधारण सभेत ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारीपदी डॉ. शैलजा भावसार, डॉ. प्रकाश ताडे, डॉ. सुनीता साळवे, डॉ. सुनीता इंजिनिअर, डॉ. संगीता तिरुमणी आणि डॉ. मेघा खरात यांना बढती देण्यात आली आहे. तर, डॉ. राजेंद्र फिरके, डॉ. लक्ष्मण गोफणे यांना तात्पुरत्या स्वरुपात ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारीपदी बढती देण्याचा विषयाला मान्यता दिली. याचसभेत सत्ताधार्यांनी उपसूचनेद्वारे स्थापत्य विभागातील लेखाधिकारी तानाजी जगदाळे यांना उप मुख्य लेखापालपदी बढती देण्यात आली आहे. त्याचबरोबर विद्युत विभागातील उप अभियंता एकनाथ पाटील, नितीन देशमुख, पिलाजी लांडे यांनी उपसूचनेव्दारे कार्यकारी अभियंतापदी बढती दिली.
भेटायला’ येण्याचा संदेश
प्रशासनाने उपसूचनेद्वारे बढत्या दिलेल्या उपअभियंत्यांचे आदेश 26 फेब्रुवारीला पारित केले. मात्र, रितसर विषय पत्रिकेवरील बढत्या दिलेल्या डॉक्टरांचे बढत्यांचे आदेश महिना उलटून गेला तरी काढले नाहीत. पालिका प्रशासन रितसर विषयाचे आदेश रखडवून उपसूचनांचा आदेश अगोदर काढत असल्याने शंका उपस्थित केली जात आहे. डॉक्टरांचे आदेश न काढून त्यांना ‘भेटायला’ येण्याचा संदेश तर यातून दिला जात नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे. याबाबत पाच दिवसांपूर्वी प्रभारी अतिरिक्त आयुक्त व प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. प्रवीण अष्टीकर यांच्याकडे विचारणा केली असता प्रक्रिया सुरु असल्याचे सांगत त्यावर त्यांनी अधिक भाष्य करण्याचे टाळले होते.