महापालिका बांधणार 5 पादचारी पूल, भुयारी मार्ग अन् सरकते जिने

0

मुंबई । मुंबईमध्ये दिवसेंदिवस वाहतूककोंडीची समस्या वाढत चालली असून पादचार्‍यांना रस्ता ओलांडणंही आता जिकिरीचं बनलं आहे. पादचार्‍यांना सुरक्षित रस्ता ओलांडता यावा यासाठी आता महापालिका डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर शीव ते लालबागदरम्यान 4 पादचारी पूल बांधणार आहे. या आर्थिक वर्षात महापालिका एकूण 5 पादचारी पूल बांधणार आहे. त्यातील गिरगाव चौपाटी वगळता सर्व पादचारी पूल डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर बांधले जाणार आहेत. यामुळे परळवासीयांना आता हा रस्ता ओलांडण्यासाठी पुलाचा सुरक्षित पर्याय उपलब्ध होणार आहे.

इथे होणार पादचारी पूल
गिरगाव चौपाटीवर सुखसागरच्या ठिकाणी.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर शीव जंक्शन येथे युनियन बँकेसमोर.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर हिंदमाता आणि जगन्नाथ शंकरशेट उड्डाणपुलाच्या मध्ये शंकर आबाजी पालव व शांती कॉफी हाऊसजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर लालबाग व परेल टी. टी. उड्डाणपुलाच्या मध्ये परेल सेट्रल रेल्वे लोको शेड जवळ.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर लालबाग व परेल टी. टी उड्डाणपुलाच्यामध्ये ताकीया मस्जीदसमोर.

भुयारी मार्ग आणि स्कायवॉकही
1 त्यानुसार त्या त्या ठिकाणची तांत्रिकदृष्ट्या तपासणी करून पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. त्यानुसार यावर्षी 5 पादचारी पूल, 5 भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहेत. याशिवाय 1 पादचारी पूल आणि 2 स्कॉयवॉकवर सरकते जिने बसवण्यात येणार आहेत.
2 मुंबईत ’एमएमआरडीए’ने 56 स्कॉयवॉक बांधले आहेत. हे सर्व स्कायवॉक ’एमएमआरडीए’ने मनपा हस्तांतरित केले आहेत. त्यामुळे मुंबईतील सर्व स्कायवॉकला सरकते जिने बसवण्याची शक्यता तपासून पाहण्यासाठी मनपा सल्लागाराची नियुक्ती करत आहे. सल्लागाराच्या अहवालानंतर सरकते जिने बसवणार.

इथे होणार भुयारी मार्ग
गिरगाव चौपाटी येथील तारापोलवाला मत्स्यालय.
एम/पूर्व विभागात छत्रपती शिवाजी महाराज चौकातील भावना ट्रस्ट स्कूलजवळील व्ही.एन.पुरव मार्ग
एम/पूर्व विभागात रामकृष्ण हरि काते चौक, व्ही. एन. पुरव मार्गावर.
एम/पूर्व विभागातील टेलीकॉम फॅक्टरी जवळील व्ही. एन. पुरव मार्गावर होणार भुयारी मार्ग.
विक्रोळी येथील आदिशंकाराचार्य मार्गावर होणार भुयारी मार्ग.