महापालिका मोशी येथे उभारणार सातवे अग्निशामक केंद्र..!

0

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील वाढती लोकसंख्या आणि हद्द पाहता महापालिकेतर्फे प्रभाग क्र.6 मोशी येथे सातवे अग्निशामक केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे 3 कोटी 75 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे स्वतंत्र अग्निशामक दल कार्यान्वित आहे. या विभागाचे मुख्य कार्यालय संत तुकारामनगर येथे आहे. त्या व्यतिरिक्त निगडी-प्राधिकरण, भोसरी, रहाटणी, चिखली आणि तळवडे येथे उपकार्यालय आहेत. औद्योगिकनगरीच्या विविध भागानुसार या सर्व कार्यालयाची उभारणी करून त्या-त्या कार्यालयातील अधिकारी, कर्मचार्‍यांकडे कामाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील घडलेली एखादी घटना किंवा अन्य दुर्घटना घडल्यास संबंधित विभागाच्या कर्मचार्‍यांना घटनास्थळी जावे लागते. पिंपरी चिंचवड शहराची हद्द सध्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शहरात घरांबरोबरच येथील लोकसंख्या देखील झपाट्याने वाढत आहे.

झोपडपट्ट्या देखील खूपच प्रमाणात वाढले आहे. शहराच्या सर्वच भागांमध्ये इमारतीच्या एखाद्या मजल्यावर, कचर्‍याच्या ढिगार्‍याला, एखादी कंपनी किंवा रस्त्यावर चालणारे वाहनांना आग लागल्याच्या घटना घडत असतात. या सर्व गोष्टींचा विचार करता पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे सातवे अग्निशामक केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी महापालिकेच्या स्थापत्य ‘इ’ प्रभाग मुख्यालयातर्फे निविदा मागवण्यात आल्या आहेत. मूळ 3 कोटी 89 लाख 56 हजार 443 रुपये किमतीच्या या कामासाठी रॉयल्टी आणि मटेरियल टेस्टिंग चार्जेस वगळून 3 कोटी 82 लाख 18 हजार 613 रुपयांवर निविदा मागवण्यात आल्या होत्या. यात मेसर्स पी.एन नागणे, मेसर्स हिरण कन्स्ट्रक्शन आणि मेसर्स यशक असोसिएट्स या तीघांनी निविदा सादर केल्या होत्या. त्यात सर्वाधिक कमी 3.60 टक्के कमी दराची निविदा मेसर्स पी.एन नागणे यांनी सादर केली. हे काम 3 कोटी 76 लाख रुपयांमध्ये करून देण्याचे त्यांनी मान्य केले. त्यांना आता या कामाचा ठेका देण्याचे प्रस्तावित आहे.