महापालिका, लोकप्रतिनिधींचा नागरिकांशी जीवघेणा खेळ सुरु?

0

प्रभाग 10 मधील नागरिकांच्या प्रतिक्रिया ः पाणी, रस्ते, गटारी, पथदिवे नसल्याने सुरक्षेसह आरोग्यही धोक्यात

जळगाव – नागरी वस्त्या झाल्या, मात्र त्यानुसार नागरी सुविधा देण्यास महापालिकेसह लोकप्रतिनिधीही अपयशी ठरत आहेत. निवडणुकीपूर्वी मोठ मोठ्या बाता करणार्‍या नगरसेवकांनाही मुलभूत समस्यांचा विसर पडला आहे. पाणीपुरवठा करण्यासाठी पाईप लाईन, चुकीच्या बांधलेल्या गटारी, पथदिवे नाहीत, अशा एक ना अनेक समस्यांनी घेरले आहे. तुंबलेल्या गटारींमुळे तसेच पथदिवे नसल्याने सुरक्षेसह आरोग्य धोक्यात आले आहे. डेंग्यू अथवा सर्पदशांने जीवीतहानी झाल्यास त्याला जबाबदार कोण? अशा प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त करुन प्रशासनासह लोकप्रतिनिधींवर नाराजी व्यक्त केली. जर वस्त्या निर्माण करतात, मग सुविधा का देत नाही, सुविधा नसतील का म्हणून कर भरायचा असा संतप्त सवालही नागरिकांनी उपस्थित केला.

…तर जबाबदार कोण?

शहरातील प्रभाग 10 मध्ये , आसावा नगर, सेंट्रल बँक कॉलनी, पिंप्राळा दक्षिण पूर्व भाग, खंडेराव नगर, हुडको घरकुल, मयुर कॉलनी, श्री गणपती नगर हा परिसर येतो. जनशक्तिच्या टीमने या परिसरात पाहणी करुन तेथील नागरिकांच्या प्रतिक्रिया तसेच प्रशासनाकडून नेमक्या अपेक्षा जाणून घेतल्या. गेल्या काही वर्षापासून याठिकाणी वास्तव्यास आहेत. मात्र रस्ते नाहीत, गटारी बांधल्या मात्र चुकीच्या पध्दतीने बांधल्या त्यामुळे गटारीतून पाणी जाण्यास जागा नसल्याने त्या तुंबल्या असून ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे डासांची उत्पत्ती होवून साथ रोगाचा प्रार्दूभाव वाढला आहे. दोन वेळच्या जेवणाचे वांधे आहेत, अशात दवाखान्याच्या खर्चामुळे जगणे मुश्‍लिल झाले. कुठल्याही प्रकार फवारणी केली जात नाही. नगरसेवक, महापालिका लक्ष द्यायला तयार नाही, भविष्यात काही जीवीतहानी झाल्यास त्याला जबाबदार कोण? अशा प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या.

चोरी, दरोड्याच्या घटनांमुळे भितीचे वातावरण

या प्रभागामध्ये वस्त्या निर्माण झाल्या तेव्हापासून पथदिवे नाहीत. त्यामुळे साहजिकच अंधार असतो, तर दुसरीकडे पोलिसांची गस्तही नियमित होत नाही. त्यामुळे अंधार व पोलिसांची गस्त नसल्याने चोरट्यांना चांगलेच फावते. गेल्या काही दिवसांपूर्वी दाम्पत्यांचे हात-पाय बांधून चोरट्यांनी दरोडा टाकला होता, तर दुसरीकडे बंद घर चोरट्यांनी लक्ष केले होते. घटना घडल्याने महिनाभर पोलिसांनी गस्त घातली, यानंतर जैसे थे परिस्थिती निर्माण झाली. पथदिव्यांबाबत अनेकदा पाठपुरावा केला मात्र काही उपयोग झाला नाही, नागरिकांनी आपल्या पैशांतून लाईट लावले असल्याचेही सांगण्यात आले.

काही भागात पाईपलाईन नसल्याने हाल

नियमित कर भरतो, मात्र इतर सुविधा सोडाच, पाणी, रस्ते, वीज या सुविधांपासूनही वंचित आहेत. चालण्याइतपत रस्ते नाहीच, मात्र पाणीपुरवठा योजना अपूर्ण आहे. काही भागांपर्यंत पाईपलाईन नसल्याने इतर ठिकाणाहून पाणी वाहून नेण्याची वेळ आली आहे. यासाठी विद्यार्थ्यांना शाळा बुडवावी लागत असल्याचे चित्र आहे. नागरिक स्वःखर्चातून पैसा उभारुन पाईप लाईन टाकण्यास तयार असतांना महापालिकेकडून टाळाटाळ केली जात आहे. पिण्यास पाणी नसतांना निगरगठ्ठ महापालिकेला जाग केव्हा येणार? दुसरीकडे वीजमीटरसाठी नागरिक तयार आहे, असे असतांना वीजमीटरही दिले जात नाही, अशाप्रकारे नागरिकांचा संताप अनावर झाला.

नागरी सुविधा न देणार्‍या बांधकाम व्यवसायिकांवर कारवाई व्हावी

नागरी वस्त्या बांधतांना सदरचा प्लॉन मंजूर करतांना नियमानुसार बांधकाम व्यवसायिकाला मुलभूत सुविधांना प्राधान्य द्यावे लागते. याठिकाणी बांधकाम झाले मात्र प्रत्यक्ष बांधकाम व्यवसायिकांकडून रस्तेही तयार केले गेले नाही, गटारीही चुकीच्या पध्दतीने बांधण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांशी खोटे बोेलून घरे घेण्यास भाग पाडण्यात आले. याबाबत महापालिकेसह आमदारांकडे तक्रार केली. नियमानुसार सुविधा न देणार्‍या बांधकाम व्यवसायिकांवर कुठलीही कारवाई झालेली नाही. बांधकाम व्यवसायिकांवर कारवाई करायला हवी.जेणे करुन इतरांची फसवणूक होणार नाही अशी अपेक्षा देखील नागरिकांनी व्यक्त केली.