महापालिका वार्‍यावर!

0

पिंपरी-चिंचवड : महापौर नितीन काळजे स्पेन दौर्‍यावर असतानाच आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शनिवारी स्वीडनकडे ’उड्डाण’ घेतले आहे. महापौर, आयुक्त यांच्या परदेशवारीची चर्चा रंगली असतानाच आता मुख्य लेखापाल राजेश लांडे आणि मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीळकंठ पोमण हेही परदेश दौर्‍यावर रवाना झाले आहेत. या दोघांच्या दौर्‍याचे खासगी संस्थेने प्रायोजकत्व केले असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे सध्या महापालिकेत परदेश दौ-याचा सुकाळ झाला आहे.

महापालिकेत सध्या पदाधिकारी, अधिकारी यांच्या दौर्‍याची ’मालिका’ सुरु आहे. या दौर्‍यावर करदात्या नागरिकांच्या पैशांची नाहक उधळपट्टी केली जात आहे. काही दिवसांपूर्वी महिला व बालकल्याण समितीचे सदस्य सिंगापूर दौरा करुन आले. त्यानंतर लगेच बीआरटी विषयक अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक आणि अधिकारी अहमादाबादला जाऊन आले.

महापौर स्पेनमध्ये, आयुक्त स्वीडनकडे
महापौर 13 नोव्हेंबरला युरोपमधील स्पेन देशाच्या दौर्‍यावर गेले आहेत. बार्सिलोना शहरात 14 ते 16 नोव्हेंबर या कालावधीत आयोजित केलेल्या ’स्मार्ट सिटी एक्स्पो वर्ल्ड काँग्रेस 2017’ या परिषदेत ते सहभागी झाले आहेत. 21 नोव्हेंबरला ते दौर्‍यावरुन परतणार आहेत. महापौर शहरात येणार तोपर्यंत आयुक्त हर्डीकर यांनी शनिवारी स्वीडनकडे ‘उड्डाण’ घेतले. ते 25 नोव्हेंबरला शहरात परतणार आहेत. स्वीडन येथील स्मार्ट सिटी निर्माण करताना जडण-घडण कशी झाली. त्याचे टप्पे कोणते, शाश्‍वत स्मार्ट वाहतूक, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, आरोग्य संदर्भात कोणत्या योजना कशा राबविल्या आहेत, याची आयुक्त हर्डीकर माहिती घेणार आहेत.

लेखापाल, आयटी अधिकारी फिलीपिन्सला
आयु्क्तापाठोपाठ लगेच मुख्य लेखापाल राजेश लांडे आणि मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीळकंठ पोमण हेही परदेश दौर्‍यावर रवाना झाले आहेत. ’फिलिपिन्स’ येथे विकास परिषदेची वार्षिक सभा आहे. या सभेत सहभागी होण्यासाठी पोमण आणि लांडे रवाना झाले आहेत. ते पाच दिवसांनी दौ-यावरुन परतणार आहेत. या दौ-याची मोठ्या प्रमाणात ’गोपनीयता’ पाळण्यात आली आहे. तसेच या र्‍याचा खर्च एका खासगी संस्थेने केला असल्याचा दावा केला जात आहे.

लांडे, पोमणांचा दौरा संशयास्पद
आयुक्त, मुख्य लेखापाल, मुख्य माहिती अधिकारी परदेश दौ-यावर रवाना झाल्यामुळे पालिका वा-यावर सोडल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. या दौ-यावर लाखो रुपयांची उधळपट्टी होत आहे. त्यामुळे करदाते नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. दरम्यान, पालिकेच्या ठेवींच्या व्याजदरात वाढ केल्याबद्दल बुधवारी (दि.15) झालेल्या स्थायी समिती सभेत मुख्य लेखापाल राजेश लांडे यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार सोहळ्याचे ’कौतुक संपतो न संपतोच’ लांडे शनिवारी परदेश दौ-यावर रवाना झाले. त्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अधिकारी पदभार सोपवून रिकामे
दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिका अतिरिक्त आयुक्त पदाचा पदभार तात्पुरत्या स्वरुपात सहायक आयुक्त डॉ. प्रवीण अष्टीकर यांच्याकडे देण्यात आला आहे. याबाबतचा आदेश पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला. तर, मुख्य लेखापाल पदाचा अतिरिक्त पदभार लेखाधिकारी प्रशांत झनकर यांच्याकडे देण्यात आला आहे.