महापालिका विद्यार्थ्यांसाठी ‘डीबीटी’ योजना राबवू नका

0

मनसे शहराध्यक्ष हेमंत डांगे यांची मागणी

पिंपरी-चिंचवड : ‘थेट लाभार्थ्यांपर्यंत फायदा’ योजनेमुळे अनेक जिल्हा परिषद व महापालिका शाळांमधील विद्यार्थी मोफत साहित्यापासून वंचित राहत आहे. साहजिकच विद्यार्थी संख्या कमी होत आहे. यामुळे ही योजना आपल्या महापालिकेत राबवू नये, अन्यथा मनसेकडून तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा शहराध्यक्ष हेमंत डांगे यांनी आयुक्तांना एका निवेदनाव्दारे दिला आहे.

योजना नको कारण…
निवेदनात म्हटले आहे, की विद्यार्थ्यांसाठी शासनाने डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (डीबीटी-थेट लाभार्थ्यांपर्यंत फायदा) नवीन योजना राबवली आहे. पुणे महानगरपालिका, जिल्हा परिषदाच्या शाळा या ठिकाणी ती राबविली जाते. मात्र, विद्यार्थ्यांना कोणत्याही मोफत साहित्याचा लाभ घेता आलेला नाही. ही योजना म्हणजे सरकारने विद्यार्थ्यांना दाखवलेले गाजर आहे. कारण विद्यार्थी हा लाभार्थी होऊ शकत नाही, विद्यार्थ्यांना बँकेत खाते काढण्यासाठी अनेक अडचणी येत असतात. याचा फायदा बँकेला होत असतो, व्यसनी पालकांकडून आपल्या पाल्याकडे दुर्लक्ष केले जाते व त्याला मिळणारे लाभ घेण्यासाठी दुकानात जाण्याचे टाळले जाते. त्यामुळे विद्यार्थी शालेय साहित्यापासून वंचित राहतो व त्याला वर्षभर कोणतेही साहित्य मिळत नाही.

विद्यार्थ्यांच्या गणवेशाबाबतची शिस्त व रंग वेगवेगळ्या पद्धतीचे दिसून येत आहे व कापडाचा दर्जाही घटताना दिसत आहे. त्यामुळे रंगीबेरंगी गणवेशात विद्यार्थी दिसत आहे. महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे आणि खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. या पाच मुद्यांचा विचार करून ही योजना आपल्या महापालिकेत राबवू नये.