महापालिका शाळांमध्ये ग्रंथालय उभारण्यात यावेत

0

मुंबई । महापालिकेच्या बहुतांश शाळांची दुरवस्था झाली आहे. अशा शाळांची दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी करताना मुलांचे प्रबोधन, साहित्य व पुस्तक वाचण्याची आवड निर्माण होण्यासाठी प्रत्येक शाळांमध्ये ग्रंथालय उभारण्यात यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. प्रशासनाने याबाबतचा प्रस्ताव शिक्षण समितीपुढे चर्चेसाठी ठेवला आहे. मुंबई महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांना प्रबोधनाकरिता अतिरिक्त साहित्याची ओळख व्हावी, दर्जेदार पुस्तके विकत घेण्याकरिता प्रत्येक शाळेला 18 हजार रुपये देण्यात येणार आहेत. मात्र, पालिकेच्या शाळांची अवस्था दयनीय असून विद्यार्थ्यांना बसायला वर्ग उपलब्ध नाहीत.

बैठकीत चर्चा होण्याची शक्यता
त्याचप्रमाणे पायाभूत सुविधांचीही वानवा आहे. यामुळे नव्याने सुरू करण्यात आलेल्या अतिरिक्त पुस्तकांची सुविधा सर्व शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याकरीता पालिकेच्या नव्याने बांधण्यात येणार्या किंवा दुरुस्त करण्यात येणार्‍या सर्व शाळांमध्ये ग्रंथालयाकरिता जागा उपलब्ध करून द्यावी, त्याबाबत उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी केली आहे.

पैशांचा अपव्यय टाळता येईल
पैशांचा अपव्यय टाळता येईल. सर्व शालेय विद्यार्थ्यांना अतिरिक्त दर्जेदार पुस्तके वाचण्यास मिळतील, असे खान यांचे म्हणणे आहे. शिक्षण समिती अध्यक्ष शुभदा गुढेकर यांनी यासंदर्भातील पत्र शिक्षण समितीपुढे चर्चेसाठी ठेवले आहे. सोमवारी (20 नोव्हेंबर) समितीच्या बैठकीत यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.